दशमहाविद्येच्या 7 रुपात देवीच्या पूजा बांधल्या जाणार आहेत
कोल्हापूर : नवरात्रोत्सवास सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. यानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाईचे विविध रुपांमध्ये विलोभनीय दर्शन रोज घडणार आहे. देवीच्या पूजेतून दशमहाविद्येचे स्वरुप भाविकांना पाहता येणार आहे. दशमहाविद्येच्या 7 रुपात देवीच्या पूजा बांधल्या जाणार आहेत.
नवरात्रोत्सव काळात रोज दुपारी 2 नंतर देवीच्या पूजेचे भाविकांना दर्शन होईल, असे करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनीश्वर यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे.
शक्ती उपासनेप्रमाणे दशमहाविद्येचे महात्म्य
दशमहाविद्या म्हणजेच देवीच्या दहा रुपांची उपासना महत्त्वाची मानली गेली आहे. महासती गौरीच्या क्रोधातून उत्पन्न झालेल्या तिच्या दहा रुपांना दशमहाविद्या असे नामकरण केले आहे. यातील प्रत्येक देवीचे रुप वेगळे असून उपासनेचे फलही वेगळे आहे. देवी महात्म्यात वर्णन केलेल्या या रुपांची महती आणि माहिती देवी भक्तांना समजावी या भावनेने नवरात्रोत्सवात रोज अंबाबाईच्या बांधल्या जाणाऱ्या सालंकृत पूजेतून दशमहाविद्येचे रुप भाविकांना घडवले जाणार आहे.
नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या बांधण्यात येणाऱ्या पूजा :
- सोमवार 22 रोजी : श्री कमलादेवी
- मंगळवार 23 : श्री बगलामुखी
- बुधवार 24 : श्री तारा
- गुरुवार 25 : श्री मातंगी
- शुक्रवार 26 (ललिता पंचमी) : श्री भुवनेश्वरी
- शनिवार 27 (त्र्यंबोली यात्रा, कोहळा पूजन) : अंबारीत विराजमान अंबाबाई
- रविवार 28 : श्री षोडशी त्रिपुरसुंदरी
- सोमवार 29 : श्री महाकाली
- मंगळवार 30 : श्री महिषासुरमर्दिनी
- बुधवार 1 ऑक्टोबर : श्री भैरवी
- गुरुवार 2 (विजया दशमी) : रथामध्ये विराजमान अंबाबाई








