माशेलच्या चालकास 14 दिवसांची पोलिस कोठडी : मृत महिला पश्चिम बंगाल राज्यातील
प्रतिनिधी/ पणजी
जुने गोवे परिसरातील हेल्थ-वे इस्पितळासमोरील रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या दोन महिलांना एका चारचाकी वाहनाने चिरडल्याने झालेल्या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी 3.20 च्या सुमारास घडली. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, जुने गोवा येथील हेल्थ वे समोरील रस्त्यावरून सुकांता प्रधान (वय 34) व सुशील बेरा (वय 58) ह्या दोन महिला चालत जात होत्या. त्याचवेळी जीए-07 एआय 9309 या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने या दोन पादचारी महिलांना चिरडले. या अपघातात वाहनाची जोरदार धडक बसल्याने महिलांचा जागीच मृत्यू झाला. ह्या दोघी महिला पश्चिम बंगाल या राज्यातील आहेत. जखमी महिलांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेले असता, त्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हा अपघात घडला त्यावेळी मोठा आवाज झाला होता. महिलांना वाहनाची जोरदार धडक बसल्याने त्या जागीच कोसळल्या. यानंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच जुने गोवे पोलिस ठाण्याचे महिला पोलिस उपनिरीक्षक जस्वीता नाईक व तपास अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक अनिष नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. जीए-07 एआय 9309 या क्रमांकाचा वाहन चालक साहील द. दिवकर (वय 24, रा. बाजारवाड़ा-माशेल) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सध्या त्याला कोलवाळ या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. दरम्यान, गोमेकॉ इस्पितळातील उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही महिलांचे मृतदेह पश्चिम बंगाल येथील त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. दोन्ही मृत महिलांपैकी एका महिलेचा मुलगा ऑकॉलॉजी ऑफ सर्व्हे या खात्यात कामाला असल्याचे समजते. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक जस्वीता नाईक करीत आहेत.









