मंदिर उभारण्याचा टीटीडीचा निर्णय : विधानसौधजवळ 7 एकरात निर्माण होणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
उत्तर कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील भाविकांच्या अनुकूलतेसाठी बेळगावमध्ये तिरुमल तिरुपती देवस्थान निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुपती देवस्थान (टीटीडी) प्रशासन मंडळाचे कर्नाटकातील सदस्य एस. नरेशकुमार यांनी शनिवारी ही माहिती दिली. बेंगळूरच्या मल्लेश्वरम येथे वेंकटेश्वर मंदिरात पत्रकार परिषदेत एस. नरेशकुमार यांनी बेळगावमध्ये तिरुमल तिरुपती देवस्थान निर्माण करण्यासंदर्भात माहिती दिली. 16 सप्टेंबर रोजी टीटीडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. बेंगळूर व देशातील इतर भागात टीटीडीकडून निर्माण करण्यात आलेल्या मंदिरांप्रमाणेच बेळगावातही वेंकटेश्वराचे मंदिर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे तिरुपतीला येण्याऐवजी येथे भेट देऊन भाविकांना वेंकटेश्वराचे दर्शन घेता येईल, असे सांगितले.
बेळगाव बालाजी ट्रस्ट या संस्थने सुवर्णसौधजवळ 7 एकर जागा खरेदी केली आहे. तेथे अंदाजे 100 कोटी रुपये खर्चून मंदिर निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पुढील महिन्यात टीटीडी व्यवस्थापन मंडळाचे टीटीडीचे अध्यक्ष बी. आर. नायडू व सदस्य या ठिकाणाला भेट देऊन पाहणी करतील. 2025 च्या डिसेंबर अखेरीस कामाला प्रारंभ होण्याची अपेक्षा आहे. श्रीवाणी ट्रस्टमार्फत हे मंदिर उभारले जाणार आहे.









