परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मुंबई :
भविष्यात येणाऱ्या 8 हजार नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने 17 हजार 450 चालक व सहाय्यकपदांसाठी भरती करण्यात येणार आहे. येत्या 2 ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या भरतीअंतर्गत एकूण 17 हजार 450 पदे भरली जाणार आहेत. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला दरमहा 30 हजार पगार देण्यात येणार आहे. शिवाय, उमेदवारांना एसटीकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, निवड झालेल्या उमेदवारांसोबत तीन वर्षांसाठी करार केला जाईल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 300 व्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबरोबरच उमेदवारांना एसटीकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. बसेसची संख्या वाढवण्यात येणार असून त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होणार आहे, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. या भरतीचा मुख्य उद्देश एसटी महामंडळाच्या सेवेला अधिक बळकट करणे आणि प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवणे आहे. 17 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या भरतीमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.









