मासा हा पाण्याबाहेर जिवंत राहू शकत नाही, अशी ठाम समजूत आहे. बहुतेक प्रकारचे मासे ही समजून सिद्धही करतात. म्हणूनच, एखाद्या व्यक्तीला त्याचे आवडते काम करु दिले नाही, तर त्याची अवस्था ‘जलबिन मछली’ अशी होते, असे म्हटले जाते. तथापि, जपानमध्ये माशाची एक प्रजाती अशी आहे, की ती पाण्याबाहेर जिवंत राहते. इतकेच नव्हे, तर पाण्याबाहेर नृत्यही करते. जपानच्या पाणथळ आणि चिखलमय भागांमध्ये हा मासा मोठ्या प्रमाणात आढळतो. तो पाण्यात आणि भूमीवर अशा दोन्ही स्थानी वास्तव्य करु शकतो. असे इतरही अनेक प्राणी आहेत, ज्यांना भूजलचर किंवा अँफिबियन्स असे म्हणतात. अशा प्राण्यांपैकी सर्वात प्रसिद्ध प्राणी कासव हा आहे. तथापि, जपानमध्ये आढळणारा हा जीव अशा भूजलरच प्राण्यांपैकी नाही. तो जातीवंत मासाच आहे. पण तो पाण्याबाहेरही प्रदीर्घ काळ जिवंत राहतो. वस्तुस्थिती अशी आहे, की तो आपल्या आयुष्याचा अधिकतर काळ पाण्याबाहेरच जगतो. तरीही त्याला त्याच्या इतर अंगवैशिष्ट्यांमुळे त्याचा समावेश मासा प्रजातीतच केला जातो. समुद्राला भरती येते तेव्हा तो पाण्यात जगतो. भरती ओसरते, तेव्हा चिखल सुकतो. त्यावेळी या माशाच्या खाण्याची सोय होते. तो चिखलात उगविलेल्या छोट्या वनस्पती, लहान मोठे कीटक, आळ्या आणि इतर छोटे जीव खावून जगतो. पुन्हा चिखलमय भूमीत भरतीचे पाणी शिरले की तो पोहू लागतो. हा अतिशय बुद्धीमान मासा म्हणून ओळखला जातो. तो आपले डोके आणि आपले नेत्र यांच्या साहाय्याने आपले शत्रू कोण आणि कोणत्या जीवापासून आपल्याला धोका आहे, हे अचूक ओळखू शकतो. त्यामुळे त्याचे चांगल्या प्रकारे संरक्षण होऊ शकते. या प्रजातीचे नर मासे मादी माशांना आकर्षित करण्यासाठी चिखलात नृत्य करतात. उड्या मारतात आणि इतरही वैशिष्ट्यापूर्ण शारिरीक हालचाली करतात. ही प्रजाती ‘मडस्कीपर’ या नावाने ओळखली जाते. या माशांमध्ये इतर प्राण्यांप्रमाणे स्वत:चे कार्यक्षेत्र ठरविण्यासाठी युद्धही होते. हे मासे पूर्णपणे कोरड्या भूमीवर अधिक काळ तग धरु शकत नसले, तरी पाणथळ स्थानी ते पाण्याबाहेर जगतात. आपली त्वचा सुकू लागली की ते पाणथळ स्थानी किंवा चिखलात लोळतात. त्वचा पुरेशी ओली झाली, की ते पुन्हा कोरड्या स्थानी येतात.
Previous Articleभारत-अमेरिका विमान प्रवास महागला
Next Article जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात डेनेज पाईपलाईनचे काम
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









