गाकुवेध महासंघाचा सरकारला इशारा
पणजी : रामा काणकोणकर हल्ला प्रकरणातील उर्वरित हल्लेखोरांना लवकरच पकडण्यात येईल, अशी ग्वाही सरकार देत असले तरी आम्हाला खरा हल्लेखोर अर्थात या प्रकरणातील मास्टरमाईंड पकडलेला हवा आहे, अशी जोरदार मागणी गाकुवेध महासंघाने केली आहे. शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी महासंघाचे अध्यक्ष रामकृष्ण जल्मी, गोविंद शिरोडकर, हर्षा वाडकर, हरि गावडे, सिद्धेश गांवकर, अॅड. जोजेफ वाझ, कार्यकारी सदस्य अॅड. पालकर यांच्यासह काही पंचसदस्य आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. काणकोणकरवर ज्याप्रकारे हल्ला झाला आहे ते पाहता तो पूर्वनियोजित कट होता हेच स्पष्ट होत आहे.
संशयितांनी केवळ हल्लाच केला नाही तर त्याचे चित्रीकरणही केले. त्याही पुढे जाताना नंतर तेथे पोहोचलेल्या पोलिसांनी हल्ल्यासाठी वापरलेले साहित्य स्वहस्ते बाजूला सारून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले आहेत. हे कृत्य पाहता हल्ल्याच्या मास्टरमाईंडला वाचविण्याचे पोलिसांकडूनही प्रयत्न सुरू आहेत की काय अशा संशयास पुष्टी मिळते, असे पालकर म्हणाले. हा हल्ला कोणी केलेला आहे व त्यामागील मास्टरमाईंड कोण आहे त्याबद्दल आम्हाला संपूर्ण माहिती आहे. मात्र त्यांची नावे सरकारकडून अधिकृतरित्या जाहीर झालेली आम्हाला हवी आहेत.
त्यामुळे दोन दिवसांच्या आत मास्टरमाईंडला अटक करण्यात यावी, अन्यथा आजच्या पेक्षाही मोठे आंदोलन उभारण्यात येईल. तसेच त्या प्रत्येक हल्लेखोराच्या घरापर्यंत जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत, असा इशारा देण्यात आला. हे आंदोलन एवढ्यावरच न थांबता हल्ल्यातील मास्टरमाईंडची ज्या ज्या किनाऱ्यावर हॉटेल्स आहेत, तेथेही आंदोलन करण्यात येईल. तेवढी ताकद आमच्या समाजात आहे व त्यावेळी आम्हाला आवरणे सरकारलाही शक्य होणार नाही, असेही पालकर यांनी सांगितले. रामकृष्ण जल्मी, गोविंद गावडे, यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही या विषयावर भाष्य करताना खऱ्या हल्लेखोरास त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी केली.









