शहाबंदर येथील खुनानंतर आरोपीने पत्नीचे माहेर चिकोडीला केले होते प्रयाण : पत्नीलाही संपविण्याचा होता इरादा
बेळगाव : आपल्या पत्नीच्या प्रियकराच्या खुनानंतर शहाबंदर, ता. हुक्केरी येथील संशयित आरोपीने पत्नीचाही काटा काढण्याचे ठरवून चिकोडी गाठली होती. मात्र, यमकनमर्डी पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे पत्नीपर्यंत पोहोचण्याआधीच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांनी सावधगिरी बाळगल्याने एक जीव वाचला आहे. शहाबंदर येथील महांतेश सिद्धाप्पा बुकनट्टी (वय 24) या तरुणाचा तलवार व चाकूने हल्ला करून भीषण खून करण्यात आला होता. याप्रकरणी यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोघा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतली नसती तर संशयित आरोपीने आपल्या पत्नीचाही काटा काढला असता, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली आहे.
बसवराज आज्जाप्पा बुकनट्टी (वय 26) व त्याचा साथीदार विठ्ठल यल्लाप्पा बुकनट्टी (वय 25) या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याजवळून खुनासाठी वापरलेली एक तलवार व चाकू जप्त केले आहेत. या दोघा जणांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहितीचा उलगडा झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार तीन वर्षांपूर्वी खून प्रकरणातील आरोपी बसवराज व अक्षता यांचे लग्न झाले. या दाम्पत्याला दीड वर्षापूर्वी एक मुलगी झाली. मुलगी आठ महिन्यांची असताना लहान बाळाला सासरी सोडून बसवराजची पत्नी चिकोडी येथील आपल्या माहेरी गेली. त्यानंतर ती शहाबंदरला परतलीच नाही. ती माहेरी जाण्याआधी खून झालेल्या महांतेशबरोबरची तिची सलगी उघडकीस आली होती. याच कारणावरून अक्षता व बसवराज दाम्पत्यामध्ये भांडण सुरू झाले होते. बसवराजने महांतेशला मारहाणही केली होती. पंचांनीही समज देऊन हे प्रकरण मिटवले होते. मात्र आठ महिन्यांच्या बाळाला सोडून पत्नी माहेरी गेली याची सल बसवराजच्या मनात होतीच. त्यामुळेच या परिस्थितीला कारणीभूत असलेल्या महांतेशचा काटा काढण्याचे ठरवून बसवराजने आपलाच नातेवाईक असलेल्या विठ्ठलची मदत घेतली.
विठ्ठलला एक कि-पॅड मोबाईल घेऊन दिला व महांतेशवर पाळत ठेवण्यास सांगितले. बुधवार दि. 17 सप्टेंबर रोजी रात्री महांतेश बसमधून बेळगावहून शहाबंदरला पोहोचला. त्याला बसमधून उतरताना पाहिलेल्या विठ्ठलने ही गोष्ट बसवराजला कळवली. महांतेश आपल्या घराजवळ असतानाच आधीच दबा धरून बसलेल्या बसवराजने त्याच्यावर हल्ला केला. तलवार आणि चाकू सोबत नेले होते. झटापटीत बसवराजच्या हातातील तलवार खाली पडली. एका झुडुपाजवळ महांतेशला नेऊन चाकूने त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. महांतेशच्या खुनानंतर त्याच्या खुनासाठी वापरण्यात आलेला चाकू घेऊन आरोपी बसवराज मोटारसायकलवरून तेथून फरारी झाला. याच दिवशी पत्नीचाही काटा काढण्याचे ठरविले होते. त्यामुळे बसवराजने चिकोडी गाठली. चिकोडी येथील पत्नीच्या माहेरी तो पोहोचला. मात्र कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते. म्हणून मोटारसायकलवरून तो तेथून बाहेर पडला. त्यामुळेच त्याची पत्नी बचावली.
पोलिसांची तत्परता…
कोणत्याही परिस्थितीत पत्नीचाही खून करायचा, यासाठी सोबत चाकू घेऊन फिरणाऱ्या बसवराजचा कट त्याचा साथीदार विठ्ठलमुळे पोलिसांना कळला. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांना ही गोष्ट कळवली. लगेच चिकोडी पोलिसांशी संपर्क साधून बसवराजच्या शोधासाठी तांत्रिक विभागाचीही मदत घेण्यात आली. चिकोडी पोलिसांनी मोटारसायकल व चाकूसह बसवराजला ताब्यात घेऊन यमकनमर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या तत्परतेमुळे अक्षताचा खून रोखता आला, असे सांगत जिल्हा पोलीसप्रमुखांनी यमकनमर्डी पोलिसांचे कौतुक केले आहे.









