तिरुपती येथे पुरस्काराचे वितरण : कर्नाटकातील अत्युत्तम कारखाना म्हणून नोंद
बेळगाव : सतीश ग्रुपच्या हुदली (ता. बेळगाव) येथील बेळगाव शुगर्स प्रा. लि. ला 2024-25 मधील कर्नाटक विभागासाठीचा गोल्डन पुरस्कार लाभला आहे. दक्षिण भारत ऊस-साखर तंत्रज्ञ संस्थेने (सिस्टा) हा पुरस्कार देऊ केला आहे. बेळगाव शुगर्सने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित दृष्टीसमेर ठेवून कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. तसेच सुधारित प्रकारातील ऊस घेण्यासाठी प्रयत्न करीत उसाचा अधिक प्रमाणात उतारा मिळविला आहे. या कार्याची सिस्टाने दखल घेतली आहे. कर्नाटक विभागातील अत्युत्तम कारखाना म्हणून नोंद करीत पुरस्कार प्रदान केला आहे. दक्षिण भारत ऊस-साखर तंत्रज्ञान संस्थेने शुक्रवार दि. 19 रोजी तिरुपती येथे आयोजित केलेल्या 54 व्या वार्षिक परिषदेत बेळगाव शुगर्सला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कारखान्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष एल. आर. कारगी व ऊस विभागाचे मुख्य व्यवस्थापक एस. आर. बिर्जे यांनी सदर पुरस्कार स्वीकारला.
कारखान्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल
संस्थापक अध्यक्ष मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. कारखान्याचे चेअरमन व सीएफओ प्रदीपकुमार इंडी यांच्या नेतृत्वातील व्यवस्थापन मंडळाचे कार्य, शेतकरी बांधवांचे सहकार्य, कारखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे कारखान्याला पुरस्कार लाभल्याची प्रतिक्रिया हिंतचिंतकांतून व्यक्त होत आहे. कारखान्याच्या सर्व विभागातील प्रमुख, कर्मचारी, व्यवस्थापन मंडळ तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रती कारखान्याचे चेअरमन प्रदीपकुमार इंडी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.









