प्रतिनिधी / पुणे
राज्यात येत्या सोमवारपर्यंत पावसाची तीव्रता कमी असेल, त्यानंतर मात्र पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान तज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे. यामुळे नवरात्रीत पावसाचा राडा पुन्हा होणार आल्याचे संकेत आहेत.
राज्याच्या अनेक भागात सध्या यलो अलर्ट आहे. गेले दोन दिवस दुपारनंतर पावसाने धुमाकूळ घातला असून, याची तीव्रता पुढील 2 दिवसात काही प्रमाणात कमी होणार आहे.
22 सप्टेंबरनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. 26 सप्टेंबरपर्यंत बंगालच्या उपसागरात नवीन हवामान प्रणाली विकसित होणार असून, महाराष्ट्रात आणखी पावसाचा जोर वाढणार आहे. एकूणच नवरात्रीत पावसाची तीव्रता वाढणार आहे, असे कश्यपी यांनी सांगितले. दरम्यान, कोकण वगळता राज्यात अनेक भागात पुढील दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पूरस्थिती कायम
राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस होत असून, सोलापूर, धाराशिव या जिह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे अनेक भागातील नद्या ओसंडून वाहत आहेत. शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुणे शहरात शुक्रवारी दुसऱ्या दिवशी देखील दुपारनंतर पावसाचा मारा सुरू होता. सखल भागात पाणी साठल्याने नागरिक त्रस्त झाले असून, पाण्याचा निचरा अतिशय संथ गतीने सुरू आहे.








