वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियन महिला संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला षटकांची गती राखता न आल्याने त्यांना सामनाधिकाऱ्यांनी दंड ठोठावला आहे.
या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी दणदणीत पराभव करुन मालिकेत बरोबरी साधली आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियन महिला संघाने पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली होती. या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना षटकांची गती राखता आली नाही. त्यामुळे आयसीसीच्या सामनाधिकारी जी. एस. लक्ष्मी यांनी ऑस्ट्रेलियन संघाला दंड केला आहे. आता या संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणाऱ्या मानधन रक्कमेतील 10 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिलीने या गुन्ह्dयाबद्दल कबुली दिली. या सामन्यामध्ये वृंदा राठी आणि जननी नारायण हे मैदानावरील पंच म्हणून होते.









