मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते होणार शुभारंभ
पणजी : राज्यातील गोमंतकीय बांधवांना हक्काचे घर मिळावे, यासाठी सरकारतर्फे प्रभावी अशी ‘माझे घर’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे कोमुनिदाद आणि सरकारी जमिनीतील घरे कायदेशीर करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतलेला आहे. सर्व कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण होणार आहेत. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ‘माझे घर’ या योजनेचा शुभारंभ करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. काल, बुधवारी कला अकादमी येथील कार्यक्रमानंतर बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी माझे घर या योजनेबाबत भाष्य केले. या योजनेचा फायदा गोव्यातील 50 टक्के गोमंतकीयांना होणार आहे. 30 वर्षांपूर्वी सरकारी किंवा कोमुनिदाद जमिनीवर गोमंतकीय बांधवांचे घर असेल त्यांना आता हक्काचे घर मिळणार आहे. वीस कलमी कार्यक्रमाद्वारे सरकारने घरे नियमित करण्यासाठी परिपत्रक काढले असून, जमिनीच्या बाजारभावाप्रमाणे मूल्य भरावे लागणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नवरात्रीपासून जीएसटीचा लाभ
येत्या 22 सप्टेंबरपासून देशात जीएसटी दर सुधारणा लागू होणार आहे. याचा फायदा सर्व राज्यांना होणार आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून केंद्रातील भाजप सरकारने हा घेतलेला निर्णय आहे. त्याचा लाभ देशातील सामान्य जनतेला होणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले.
साडेतीनशे कोटींची उलाढाल
राज्यातील 50 हजार महिला ह्या स्वयंसहाय्य गटाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत. त्या आता स्वावलंबी बनत असून, मागील दहा वर्षांत सुमारे साडेतीनशे कोटी ऊपयांची उलाढाल स्वयंसहाय्य गटांन केली असल्याने बँकांनी त्यांना कोणतीही हमी नसताना कर्जे वाटप केलेली आहेत, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
स्वदेशी मोहिमेला पाठबळ द्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘17 ते 2 ऑक्टोबर या काळात देशाबरोबर राज्यातही सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आदी कर्मयोगी अभियान व आदी सेवा पर्व’ हे अभियान आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सुरू केले आहे. याशिवाय ‘आदी संयोगी व आदी सखी’ या उपक्रमाद्वारे पंतप्रदानांनी स्वदेशी आत्मनिर्भरचा नारा देशवासीयांना दिलेला आहे. त्यामुळे भारताबरोबरच गोवा राज्यातील जनतेने भारतात उत्पादित झालेल्या वस्तूंचाच वापर करावा. स्वदेशी मोहिमेला पाठबळ द्यायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.









