आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे प्रतिपादन : पंतप्रधानांच्या नावे विविध योजनांचा शुभारंभ
पणजी : देशचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारधारा देशासाठी महत्त्वाची असून त्यांनी सर्व प्रकारच्या सवलती गरीबांपर्यंत पोहोचवल्या आहेत. स्वच्छतेचा मार्ग त्यांनी दाखवला असून ती मोहीम आता गोव्यासह देशभर राबवण्यात येत आहे. सामान्य जनतेसाठी मोदी यांनी मोठे योगदान दिले असून आम्ही गोव्यातील जनता तसेच सफाई कमगार यांच्यासाठी काहीतरी करूया, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजित राणे केले आहे.पणजीत मिनेझिस ब्रागांझा सभागृहात झालेल्या ‘स्वच्छता ही सेवा 2025’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने राणे बोलत होते. त्यांनी पंतप्रधानांच्या नावे विविध योजनांचा शुभारंभ केला आणि त्या गोव्यातील लोकांसाठी लागू झाल्या असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री स्वानिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना अशी त्यांची नावे असून राणे यांनी त्यांचे लोकार्पण केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत होते, तथापि ते आलेच नाहीत. नगरविकास खात्याचे संचालक ब्रिजेश मणेरकर, नगरविकास खाते सचिव यतीन मराळकर, पणजी महानगरपालिका आयुक्त ग्लेन मदेरा, मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी मधू नार्वेकर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वैद्यकीय शिबिर घेण्यात आले. त्याचा लाभ अनेकांनी घेतला. मणेरकर व मराळकर यांची कार्यक्रमात भाषणे झाली. पर्वरी येथील मंत्रालयात झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत एकूण कार्यक्रम निश्चित करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव तसेच नगरविकास खाते, पंचायत, पर्यटन, पर्यावरण, आरोग्य, ग्रामीण विकास, कचरा व्यवस्थापन आणि इतर विविध खात्यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. वरील सर्व खात्यांच्या सहकार्याने हा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. सदर स्वच्छतेसाठी विविध पथके स्थापन करण्यात आली असून त्यात अनेक खात्याचे अधिकारी समाविष्ट आहेत.
नगरपालिकांना रोख बक्षिसे
सर्वाधिक चांगली स्वच्छता राखणाऱ्या नगरपालिकांना रु. 10 लाख, रु. 5 लाख, रु. 3 लाख अशी अनुक्रमे तीन बक्षिसे देण्यात येणार असून सर्व सफाई कामगारांची आरोग्य खात्यातर्फे मोफत तपासणी होणार असल्याची माहिती मंत्री राणे यांनी दिली.
गोव्यात 95 ठिकाणी स्वच्छता उपक्रम
‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेंतर्गत राज्यात 95 ठिकाणी स्वच्छता उपक्रम राबवण्यात येणार आहेत. बसस्थानके, मार्केट, शाळा, पर्यटनस्थळे, नाले, तलाव इत्यादी विविध ठिकाणांचा समावेश करण्यात आला आला असून ही मोहीम 2 ऑक्टोबरपर्यंत चालेल.
सफाई कामगारांसाठी 43 आरोग्य शिबिरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा योग साधून ही मोहीम आखण्यात आली आहे. या कालावधीत राज्यभरात 43 आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून त्यात सफाई कामगारांची तपासणी करण्यात येणार आहे.









