सामनावीर स्मृती मानधनाचे शतक : क्रांती गौडचे 3 बळी
वृत्तसंस्था/ चंदीगड
येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात स्मृती मानधनाची शानदार शतकी खेळी, भेदक गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर 102 धावांनी विजय मिळवला. भारताने 292 धावा केल्यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ 192 धावांत ऑलआऊट झाला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. उभय संघातील तिसरा व निर्णायक सामना दि. 20 रोजी होणार आहे.
प्रारंभी. ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या दोघींनी सलामीला 70 धावांची भागीदारी केली. पण प्रतिकाला 12 व्या षटकात अॅश्ले गार्डनरने जॉर्जिया वेरहॅमच्या हातून झेलबाद केले. प्रतिकाने 32 चेंडूत 25 धावांची खेळी केली. त्यानंतर स्मृतीला हरलिन देओलची साथ मिळाली. हर्लिन एका बाजूने अत्यंत संयमी खेळ करत असताना दुसऱ्या बाजूने मात्र स्मृतीने आक्रमक खेळ केला. मानधनाने 45 चेंडूत तिचे अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर 18 व्या षटकात स्मृतीने दोन चौकार आणि एक षटकारासह आक्रमण केले. दरम्यान, त्यानंतर 19 व्या षटकात धावांसाठी पळताना गोंधळ झाला. त्यामुळे हरलिन 24 चेंडूत 10 धावांवर असताना विकेट गमवावी लागली. त्यामुळे स्मृतीला साथ देण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर मैदानात आली. तिने मानधनाला चांगली साथ दिली. पण ती फार काळ टिकू शकली नाही.
हरमनप्रीतला 26 व्या षटकात अॅश्ले गार्डनरने 17 धावांवर बाद केले. तरी दुसऱ्या बाजूने स्मृती दमदार खेळ करत होती. तिने मोठे फटकेही मारले होते. अखेर तिने दीप्ती शर्मासोबत फलंदाजी करत असताना 77 चेंडूत तिचे शतक पूर्ण केले. तिचे हे दुसरे सर्वात जलद शतक आहे, तसेच भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातीलही वनडेतील दुसरे सर्वात जलद शतक आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर मानधना असून तिने याचवर्षी राजकोटला आयर्लंडविरुद्ध वनडेत 70 चेंडूत शतक केले होते. स्मृतीने वनडेतील 12 वे शतक झळकावताना 91 चेंडूत 14 चौकार आणि 4 षटकारासह 117 धावांची खेळी साकारली. तिला दीप्तीने 40 धावा करत चांगली साथ दिली. इतर भारतीय फलंदाज मात्र अपयशी ठरल्या. टीम इंडियाचा डाव 49.5 षटकांत 292 धावांत आटोपला.
ऑस्ट्रेलियन संघ पराभूत
भारतीय संघाने विजयासाठी दिलेल्या 293 धावांचा पाठलाग करताना कांगारुंचा संघ 40.5 षटकांत 190 धावांत ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून अनाबेल सदरलँडने सर्वाधिक 45 धावांचे योगदान दिले तर एलिस पेरीने 44 धावा केल्या. इतर फलंदाज मात्र ठराविक अंतराने बाद होत गेल्याने त्यांना या सामन्यात 102 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करताना ऑसी संघाला चांगलाच दणका दिला.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ – 49.5 षटकांत सर्वबाद 292 (स्मृती मानधना 91 चेंडूत 117, दीप्ती शर्मा 53 चेंडूत 40, रिचा घोष 29, स्नेह राणा 24, डॅर्सी ब्राऊन 3 बळी, गार्डनर 2 बळी)
ऑस्ट्रेलिया 40.5 षटकांत सर्वबाद 190 (एलिस पेरी 44, सदरलँड 45, गार्डनर 17, क्रांती गौड 3 बळी, दीप्ती शर्मा 2 बळी)









