22 सप्टेंबरपासून अनेक वस्तू होणार स्वस्त : कंपन्या-व्यापारीही सज्ज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने नवीन वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरांबाबतची अधिसूचना बुधवारी जारी केली. हे नवीन दर 22 सप्टेंबरपासून लागू होतील. 3 सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीत करण्यात आलेल्या मोठ्या बदलांनंतर अर्थ मंत्रालयाची ही अधिसूचना आली आहे. या सुधारित अधिसूचनेनसार आता 28 जून 2017 च्या अधिसूचनांमधील निर्देशांमध्ये योग्य ते बदल करण्यात आले आहेत.
नव्या सूचनेनुसार, 22 सप्टेंबरपासून वस्तू आता नवीन दरांनी विकल्या जातील. ग्राहकांना जीएसटी दरांचा प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता पुढील काही दिवसांत प्रत्येक राज्य नवीन जीएसटी दर लागू करण्यासाठी स्वतंत्र अधिसूचना जारी करेल.
3 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत जीएसटी परिषदेने 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन मुख्य दर शिफारस केल्यामुळे 12 टक्के आणि 28 टक्के हे दोन महत्त्वाचे टप्पे वगळण्यात आले. परिषदेने ‘सिन’ आणि लक्झरी वस्तूंसाठी 40 टक्के जास्त दरांची शिफारस केली असली तरी त्यावरील उपकर रद्द करण्यात आला आहे.
जीएसटी दरांमध्ये मोठे बदल झाल्यानंतर सामान्य गरजेच्या वस्तू लक्षणीयरीत्या स्वस्त होणार आहेत. 28 टक्के स्लॅबमधील बहुतेक उत्पादने 18 टक्के श्रेणीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच 12 टक्के स्लॅबमधील उत्पादने 5 टक्के श्रेणीत ठेवण्यात आल्या आहेत. तसेच 18 टक्के स्लॅबमधील काही अन्नपदार्थ 5 टक्के श्रेणीत सामावून घेण्यात आले आहेत. या बदलामुळे टूथपेस्ट, साबण आणि शॅम्पूपासून ते एसी, कार, बाईक आणि टीव्हीपर्यंतच्या उत्पादनांवरील दर कमी झाले आहेत.









