भूस्खलनामुळे 22 दिवसांपासून होती बंद
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील कटरा येथे 22 दिवसांपासून थांबवण्यात आलेली वैष्णोदेवी यात्रा बुधवार, 17 सप्टेंबरपासून नव्या दमाने पुन्हा सुरू झाली आहे. तीर्थयात्रा मार्गावरील अर्धकुंवारीजवळ भूस्खलन झाल्यामुळे 26 ऑगस्टपासून ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. माता वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी ही आनंदाची बातमी आहे. श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने मंगळवारी एका ‘एक्स’ पोस्टमध्ये यात्रामार्ग सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. श्राइन बोर्डाने भक्तांना अधिकृत माध्यमांद्वारे अपडेट राहण्याचे आवाहन केले. यापूर्वी 14 सप्टेंबर रोजी तीर्थयात्रा पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती, परंतु प्रतिकूल हवामानामुळे हा निर्णय पुढे ढकलावा लागला होता. आता, 22 दिवसांनंतर भाविक पुन्हा माता वैष्णोदेवी मंदिराचे दर्शन घेऊ शकतील.









