वृत्तसंस्था / झाग्रेब (क्रोएशिया)
येथे सुरू असलेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत चौथ्या दिवशी भारताच्या एकमेव मल्लाने लढत जिंकली. महिलांच्या विभागात वैष्णवी पाटील आणि प्रिया मलिक यांचे भवितव्य जवळपास संपुष्टात आले आहे.
महिलांच्या 50 किलो वजन गटात नातालिया व्हॅरेकिनाने भारताच्या अंकुशचा 6-5 अशा गुणांनी पराभव केला. तर मॅक्सीकोच्या चावेझने तपस्याचा 4-2 असा पराभव केला. अंकुश आणि तपस्या या भारतीय महिलांचे स्पर्धेतील आव्हान समाप्त झाले आहे. महिलांच्या अन्य एका लढतीत भारताच्या वैष्णवीने पहिल्या लढतीत लॅटियाच्या झिडेलेरचा 3-1 असा पराभव केला. पण त्यानंतरच्या पुढील लढतीत मंगोलियाच्या पाचव्या मानांकीत तुवेशिनजरगालने वैष्णवीचा 4-2 असा पराभव केला. 76 किलो वजन गटात इक्वेडोरच्या व्हॅलेडेजने भारताच्या प्रियाचा 4-2 असा फडशा पाडला. पुरूषांच्या विभागात भारताच्या सुजित कालकल आणि विकी यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.









