पर्वरी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
पणजी : माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले असून त्यासाठी प्रस्तावाची वाट पाहत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. तसेच आपण भाजप प्रवेशासाठी तयारी केल्याचे सांगितले. तसा प्रस्ताव येण्याची वाट पाहत आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी पर्वरी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, आपल्या भाजप प्रवेशासाठी पक्ष प्रमुखांना विचारा. तसा प्रस्ताव आला तरच विचार करणार असून परत येण्यास तयार आहे. पुनरागमनासाठी उशीर झाला आहे असे वाटत नाही.
काही गोष्टी घडण्यासाठी वेळ यावी लागते. त्या वेळेलाच काही गोष्टी घडतात. त्यासाठी अनेकदा मुहूर्त पाहिला जातो, असेही पार्सेकर म्हणाले. मांद्रे मतदारसंघातील भाजपच्या स्थितीवर बोलताना त्यांनी सांगितले की, आपण भाजपच्या घराबाहेर आहे. त्यामुळे घरावर बोलणे योग्य होणार नाही. पुनरागमनानंतर त्यावर भाष्य करेन किंवा जबाबदारी मिळाल्यावर बोलेन. मला कोणी घरातून बाहेर काढलेले नसल्यामुळे कोणावरही राग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेशचतुर्थीला मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे जेवणाच्या वेळेला आपल्या घरी आले होते. त्यावेळी त्यांना जेवणाचे निमंत्रण दिले. त्यांनी ते स्वीकारले तेव्हा दोघांनी एकत्र जेवण केले. ते फोटो प्रसारित झाल्याची माहिती पार्सेकर यांनी दिली.









