महांतेश कवटगीमठ यांची राज्य सरकारवर टीका
बेळगाव : राज्य सरकार जाती जनगणनेच्या नावाखाली हिंदू समुदायाला विभागण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदू समुदायाला इतर जातीत आणण्याचे षडयंत्र राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. राज्य सरकार जाणीवपूर्वक जाती जनगणतेत इतर जातीचा कॉलम समाविष्ट करून हिंदू समुदायाला दुभंगण्याचा डाव आखला आहे. याचा हिंदू जनजागृती महासंघ निषेध करत असून आपण या विरोधात राज्यपालांची भेट घेणार आहे. अशी माहिती माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांनी दिली.
नेहरुनगर येथील हॉटेल सेंट्रल बँकवेट येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कवटगीमठ पुढे म्हणाले, राज्यात हिंदू समुदाय मोठ्या संख्येने आहे. राज्य सरकार आपली मतपेटी वाचविण्यासाठी हिंदू समुदायाला विभागण्याचा प्रयत्न करीत आहे. जनगणनेदरम्यान माहिती घेण्यात येणाऱ्या कागदपत्रांमध्ये एक विशिष्ट कॉलम समाविष्ट करण्यात आला आहे. या कॉलमद्वारे हिंदू समाज फोडण्याचे षडयंत्र राज्य सरकार करत आहे. याचा आम्ही राज्यभर विरोध करणार असून परिणामी रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला.
अॅड. एम. बी. जिरली म्हणाले, राज्य सरकारकडून होत असलेल्या षडयंत्राचा आम्ही कडक शब्दात निषेध करतो. 17 सप्टेंबर रोजी गांधी भवन येथे हिंदू जनजागृती महासभेच्यावतीने हिंदू समाजबांधवांचा मेळावा आयोजित करणार आहोत. मेळाव्यानंतर याबाबत रुपरेषा ठरवून वेळेप्रसंगी राज्यभरात राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्याबाबतही ठरविण्यात येणार आहे. याचा गांभीर्याने विचार करून राज्य सरकारने हिंदू समुदाय विरोधी कृती त्वरित थांबवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी हिंदू जनजागृती महासभेचे पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.









