सेन्सेक्स 118 अंकांनी नुकसानीत : बँक निर्देशांक तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सलग आठ दिवसांच्या तेजीला अखेर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी ब्रेक लागल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 118 अंकांनी घसरणीत राहिला होता. आशियाई बाजारात मिळताजुळता कल दिसून आला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 118 अंकांनी घसरत 81785 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 44 अंकांनी नुकसानीसह 25069 अंकांवर बंद झाला होता. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत व्याजदरात कपातीचा निर्णय घेतला जातो का याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली आहे. तज्ञांनी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल असे मत नोंदवले आहे. सकाळी सेन्सेक्स 20 अंकांच्या तेजीसह 81,925 अंकांवर खुला झाला होता. निफ्टीही तेजीसह 25,118 अंकांवर खुला झाला होता.
सेन्सेक्समध्ये पाहता एशियन पेंटस्, महिंद्रा आणि महिंद्रा, टायटन व इन्फोसिस यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले होते तर बजाज फायनान्स, इटर्नल, अल्ट्राटेक सिमेंट व रिलायन्स इंडस्ट्रिज यांचे समभाग मात्र चांगल्या तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाले होते. निफ्टी मिडकॅप व निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.44 टक्के आणि 0.76 टक्के तेजीसह बंद झाले होते. रियल्टी निर्देशांक सर्वाधिक 2.41 टक्के इतका वाढलेला होता. दुसरीकडे आयटी निर्देशांक 0.58 टक्के व फार्मा निर्देशांक 0.64 टक्के इतके घसरलेले होते. एनएसईच्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्ये आतापर्यंत विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी 10,782 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले आहेत. ऑक्टोबर 2024 ते मार्च 2025 पर्यंत पाहता विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 2.2 लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत.









