नुपूरला रौप्य तर पूजाला कांस्यपदक
वृत्तसंस्था/ लिव्हरपूल
येथे सुरु असलेल्या पुरुष आणि महिलांच्या विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय महिलांनी नवा इतिहास घडविला. महिलांच्या विभागात जस्मिन लंबोरिया आणि मिनाक्षी यांनी आपल्या वजन गटातून सुवर्णपदके मिळविली. तर नुपूरने रौप्यपदक आणि पूजाने कांस्यपदक घेतले. महिलांच्या 57 किलो वजन गटातील खेळविण्यात आलेल्या सुवर्णपदकासाठीच्या लढतीत भारताची जस्मिन लंबोरियाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारी पोलंडची जुलिया झेरेमेटाचा 4-1 अशा गुणांनी पराभव केला. या लढतीसाठी नियुक्त केलेल्या विविध पंचांनी जस्मिनला या लढतीत 30-27, 29-28, 30-27, 28-29, 29-28 असे विजयी म्हणून घोषित केले.
महिलांच्या 48 किलो वजन गटातील अंतिम लढतीत भारताच्या मिनाक्षीने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणारी कझाकस्तानची नेझिम केझबेचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. 24 वर्षीय जस्मिनची ही तिसरी विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धा आहे.
महिलांच्या 80 किलोवरील वजन गटात भारताच्या नुपूर शेरॉनला पोलंडच्या अॅगेटा केझमार्सकडून हार पत्करावी लागल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पोलंडच्या अॅगेटाने नुपूरचा 3-2 असा निसटता पराभव करत सुवर्णपदक पटकाविले.
महिलांच्या 80 किलो वजन गटात भारताच्या पूजा राणीने कांस्यपदक मिळविले. या वजन गटातील झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ब्रिटनच्या इमेली अॅसक्वेतने पूजाचा 4-1 अशा गुणांनी पराभव केला. या पराभवामुळे पूजा राणीला कांस्यपदक मिळाले. विश्व मुष्टियोद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेच्या इतिहासामध्ये सुवर्णपदके मिळविणाऱ्या महिला मुष्टियोद्ध्यांच्या यादीमध्ये आता जस्मिन आणि मिनाक्षी यांचा समावेश झाला आहे. भारताची माजी आंतरराष्ट्रीय महिला मुष्टियोद्धी तसेच सहा वेळेला विश्व विजेतेपद मिळविणाऱ्या मेरी कॉमने 2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018 साली या स्पर्धेत सुवर्णपदके मिळविली आहेत. तसेच निखत झरीनने 2022 आणि 2023 साली दोन वेळेला सुवर्णपदके पटकाविली आहेत. सरितादेवीने 2006 साली, जेनी आर.एल.ने 2006 साली, के.सी. लेखाने 2006 साली, नितू घंघासने 2023 साली, लवलिना बोर्गोहेनने 2023 साली आणि स्वाती बोराने 2023 साली या स्पर्धेत सुवर्णपदके मिळविली आहेत.









