प्रतिनिधी / पुणे, नाशिक
‘जो ओबीसी नाही, असा एकही नकली व्यक्ती ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार नाही. या संदर्भात जीआरमध्ये पुरेशी काळजी घेण्यात आली असल्याचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला त्यांचे हित पाहणारे कोण आहेत हे चांगलेच समजते, असा टोला विरोधकांना लगावला. ओबीसी समाजासाठी जे काही केले आहे ते आमच्या सरकारनेच केले आहे असे सांगत याबाबत खुल्या चर्चेचे आव्हानही फडणवीस यांनी विरोधकांना दिले. फडणवीस रविवारी विविध कार्यक्रमांसाठी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पवार साहेब ‘एक्स’ म्हणाले की ‘वाय’ समजायचे याकरता प्रसिद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याची एकीची वीण उसवली जात असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच, वर्तमानपत्रात सरकारविरोधात ‘देवा तूच सांग‘ अशा आशयाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, पवार साहेब ‘एक्स‘ म्हणाले की ‘वाय‘ समजायचे याकरता प्रसिद्ध आहेत. ते मोठे नेते असल्याने त्यांच्यावर अधिक बोलणे योग्य नाही, असेही त्यांनी नमूद केले.
तोपर्यंत दोन समाजातील तेढ कमी होणार नाही
लातूर जिह्यात दोन ओबीसी तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटनेबद्दल बोलताना फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, जोपर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवणार नाहीत, तोपर्यंत दोन समाजातील तेढ कमी होणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर ‘आरक्षण गेलेले आहे‘ अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून, यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘केवळ ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांनाच प्रमाणपत्रे मिळणार आहेत, बिना नोंदीचे कोणालाही प्रमाणपत्र मिळणार नाही,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. समाजाचे भले केवळ वास्तविकता पोहोचवल्यानेच होऊ शकते, राजकारणाने नव्हे, असा टोलाही त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना लगावला.
आता सामाजिक ऐक्यालाच तडा बसत आहे- ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली खंत
राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू आहे. यामध्ये सरकारने एका जातीची समिती न करता, सर्वसमावेशक समिती तयार करावी, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. सरकार कोणत्याही एका जाती-धर्माचे नाही, ते सर्वांचे असायला हवे. सामाजिक ऐक्य हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्या राहिले आहे. सामाजिक ऐक्य जपले गेले पाहिजे. आता या ऐक्यालाच तडा बसत आहे अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याची तयारी दर्शवली, ज्याला ओबीसी समाजाने तीव्र विरोध केला आहे. या जीआरच्या वैधतेबद्दल विचारले असता, शरद पवार म्हणाले की, एक समिती एका मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, तर दुसरी दुसऱ्याच्या अध्यक्षतेखाली आहे. सरकारने असे करणे योग्य नाही. सरकार कुठल्याही जातीधर्माचे नाही, सरकार सर्वांचे असावे, सरकार व्यापक असावे. कोणतीही कमिटी एका जातीची करू नका, समाजाची करा. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की सामाजिक ऐक्य हवे, त्यात अंतर नको, असा सल्लाही शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.
जरांगेंना पाठिंब्याच्या आरोपावर स्पष्टीकरण
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांवरही शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले. ‘ज्याचा आमच्याशी कवडीचाही संबंध नाही, त्यावर बोलण्याची गरज नाही. हे आरोप सत्यावर आधारित नाहीत,’ असे म्हणत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.








