हारुगेरी पोलिसांची यशस्वी कामगिरी
प्रतिनिधी/ बेळगाव
दोघा अट्टल मोटारसायकल चोरांना अटक करून त्यांच्याजवळून 8 लाख 15 हजार रुपये किमतीच्या 12 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. हारुगेरी पोलिसांनी ही कारवाई केली असून रायबागसह वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
सागर चन्नदासर राहणार हारुगेरी, ता. रायबाग, शिवानंद कांबळे राहणार हिडकल, ता. रायबाग अशी त्यांची नावे आहेत. शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी अमजदखान शब्बीर मुजावर, राहणार कुडची, ता. रायबाग यांनी हारुगेरी पोलीस स्थानकात मोटारसायकल चोरी प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनंतर या दोघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून 12 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी, हारुगेरीचे पोलीस निरीक्षक रतनकुमार जिरग्याळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळाप्पा पुजेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
3 जून 2025 रोजी रात्री 8 ते 9 यावेळेत हारुगेरी येथील यलपारट्टी रोडवर केए 71 ई 4528 क्रमांकाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल उभी करण्यात आली होती. या मोटारसायकलची चोरी झाली होती. सर्वत्र शोध घेऊनही ती मिळाली नाही. 12 सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक विभागाच्या मदतीने सागर व शिवानंद यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.









