प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकार मागासवर्ग आयोगामार्फत 22 सप्टेंबरपासून सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाला सुरुवात करणार आहे. या सर्वेक्षणावेळी मराठा समाजातील सर्व पोटजातींनी धर्म हिंदू, जात मराठा आणि पोटजातीच्या कॉलममध्ये कुणबी असे नोंदवावे, असे आवाहन विधानपरिषदेचे सदस्य आणि मराठा समुदायाचे नेते डॉ. मारुतीराव मुळे यांनी केले आहे.
शनिवारी बेंगळूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या जातनिहाय सर्वेक्षणात मराठा समाजातील सर्व पोटजातींनी एकाच प्रकारे जात आणि पोटजात नमूद केल्यास आपल्या समुदायाची एकूण लोकसंख्येची अधिकृत माहिती मिळेल. मराठा समाजाची आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती जाणून घेण्यास सरकारला अनुकूल होईल. यामुळे मराठा समाजाला एकत्र येण्यास आणि आगामी काळात सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा मिळण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
कर्नाटक मराठा समाजातील ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री पी. जी. आर. सिंधीया, जगद्गुरु गोसावी मठाचे वेदांताचार्य मंजुनाथ भारती स्वामीजी, मंत्री संतोष लाड, आमदार श्रीनिवास माने, कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष सुरेश साठे, मराठा वेलफेअर असोसिएशनचे नेते मनोज, सुनील तसेच मराठा समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.सर्वेक्षणात समुदायाने सहभागी होऊन एकजूट दाखवावी. या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.









