दक्षिण विभाग 233 धावांनी पिछाडीवर
वृत्तसंस्था / बेंगळूर
2025 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर मध्य विभागाची वाटचाल जेतेपदाकडे आहे. या सामन्यात दक्षिण विभागाचा संघ 233 धावांनी पिछाडीवर असून त्याने दुसऱ्या डावात 2 बाद 129 धावा जमविल्या.
या सामन्यात दक्षिण विभागाचा पहिला डाव 149 धावांत आटोपल्यानंतर मध्य विभागाने पहिल्या डावात 511 धावांचा डोंगर रचून 362 धावांची भक्कम आघाडी दक्षिण विभागावर घेतली. मध्य विभागाने 5 बाद 384 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांच्या शेवटच्या पाच गड्यांनी 127 धावांची भर घातली. 137 धावांवर नाबाद राहिलेल्या यश राठोडचे द्विशतक केवळ 6 धावांनी हुकले. त्याने 286 चेंडूत 2 षटकार आणि 17 चौकारांसह 194 धावा झोडपल्या. सलामीच्या मालेवारने 5 चौकारांसह 53 धावा केल्या. कर्णधार रजत पाटीदार शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी शानदार शतक (101) झळकविले होते. सारांश जैन आणि यश राठोड या जोडीने सहाव्या गड्यासाठी 176 धावांची शतकी भागिदारी केल्याने मध्य विभागाला 500 धावांचा टप्पा ओलांडता आला. दीपक चहरने 49 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 37 धावा जमविल्या. 145.1 षटकात मध्य विभागाचा पहिला डाव 511 धावांवर आटोपला. दक्षिण विभागातर्फे गुरूजपनित सिंग आणि अंकित शर्मा यांनी प्रत्येकी 4 गडी तर निधेश आणि कौशिक यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. उपाहारानंतर काही वेळातच मध्य विभागाचा पहिला डाव समाप्त झाला.

362 धावांनी पिछाडीवर असलेल्या दक्षिण विभागाने आपल्या दुसऱ्या डावाला सावध सुरूवात केली. अगरवाल आणि मोहीत काळे यांनी सलामीच्या गड्यासाठी 62 धावांची भागिदारी केली. काळेने 7 चौकारांसह 38 तर अगरवालने 2 चौकारांसह 26 धावा जमविल्या. दिवसाअखेर दक्षिण विभागाने दुसऱ्या डावात 33 षटकात 2 बाद 129 धावा जमविल्या. रविचंद्रन समरन 1 षटकार आणि 5 चौकारांसह 37 तर भुई 1 षटकार आणि 3 चौकारांसह 26 धावांवर खेळत आहे. मध्य विभागातर्फे सारांश जैन आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यातील खेळाचे दोन दिवस बाकी असून मध्य विभागाचा संघ हा सामना एकतर्फी जिंकून दुलीप करंडक मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
संक्षिप्त धावफलक: दक्षिण विभाग प. डाव 149, मध्य विभाग प. डाव 145.1 षटकात सर्वबाद 511 (यश राठोड 194, पाटीदार 101, सारांश जैन 69, मालेवार 53, दीपक चहर 37, वाडकर 22, गुरूजपनित सिंग आणि अंकित शर्मा प्रत्येकी 4 बळी, निधेश आणि कौशिक प्रत्येकी 1 बळी), दक्षिण विभाग दु. डाव 33 षटकात 2 बाद 129 (अगरवाल 26, काळे 38, समरन खेळत आहे 37, भुई खेळत आहे 26, सारांश जैन, सेन प्रत्येकी 1 बळी)









