हासन जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीवेळी हृदयद्रावक घटना
प्रतिनिधी/ बेंगळूर
गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवेळी भरधाव कंटेनरने चिरडल्याने 8 गणेशभक्तांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले. हासन जिल्ह्यातील मोसळेहोसळ्ळी (ता. होळेनरसीपूर) येथे शुक्रवारी रात्री ही हृदयद्रावक घटना घडली. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
मोसळेहोसळ्ळी येथे शुक्रवारी सायंकाळी सार्वजनिक गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक निघाली होती. मिरवणूक राष्ट्रीय महामार्ग क्र. 373 वरून जात असताना रात्री 9:30 च्या सुमारास मागील बाजूने आलेल्या कंटेनरने मिरवणुकीतील गणेशभक्तांना चिरडले. चालकाचे कंटनरवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. सदर कंटेनर हासनहून होळेनरसीपूरच्या दिशेने निघाला होता.
दुर्घटनेत घटनास्थळी 4 तर इस्पितळात 4 गणेशभक्तांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मृतांमध्ये युवकांची संख्या अधिक आहे. 20 जण जखमी झाले. गंभीर जखमींना हासन जिल्हा रुग्णालयात तर किरकोळ जखमींना होळेनरसीपूर तालुका इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी हासन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, आमदार एच. डी. रेवण्णा, विधानपरिषद सदस्य सूरज रेवण्णा, निजदचे युवा अध्यक्ष निखिल कुमारस्वामी यांनी भेट देऊन पाहणी केली.









