16 ऑक्टोबरपर्यंत चालणार : ‘नोटम’ जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय हवाई दलाने ईशान्येकडील प्रदेशात म्हणजेच चीन, भूतान, म्यानमार आणि बांगलादेशच्या सीमेजवळ एक मोठा सराव आयोजित केला आहे. हा सराव 25 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालणार असून त्यात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा समावेश असेल. सीमेवरील संयुक्त दलांची ऑपरेशनल क्षमता, जलद प्रतिसाद आणि समन्वयाची चाचणी घेणे हा या सरावामागील मुख्य उद्देश आहे. हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांच्या पार्श्वभूमीवर ‘नोटम’ जारी करण्यात आली आहे.
भारतीय हवाई दलाकडून ईशान्येकडील प्रदेशात होणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सराव असल्याचे मानले जात आहे. याचे कार्यक्षेत्र ईशान्येकडील संपूर्ण भारतीय प्रदेशात व्यापलेले असून हा सराव प्रादेशिक सुरक्षा मजबूत करण्यास मदत करेल. भारतीय हवाई दल आणि नागरी विमान वाहतूक प्राधिकरण वेळोवेळी ‘नोटम’ म्हणजेच ‘विमानचालकांना सूचना’ जारी करतात. हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांच्या पार्श्वभूमीवर वैमानिक आणि विमान कंपन्यांना हवाई सुरक्षा, नेव्हिगेशन आणि ऑपरेशन्सशी संबंधित महत्त्वाच्या बदलांची माहिती देते. हवाई क्षेत्रात तात्पुरता बदल करणे, धावपट्टी बंद होणे, कोणताही नवीन अडथळा किंवा तात्पुरती रचना किंवा एखाद्या क्षेत्रात लष्करी सराव, ड्रोन उ•ाण किंवा नैसर्गिक आपत्ती यासारख्या असामान्य परिस्थितीत सामान्यत: ‘नोटम’ जारी केली जाते. याशिवाय, विमान ऑपरेशन्समध्ये बदल, नेव्हिगेशन उपकरणांमध्ये समस्या किंवा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संबंधित गैरसोय झाल्यास देखील ही सूचना जारी केली जाते.









