500 ग्राम पंचायती, सचिवांवर अतिरिक्त भार : गावातील समस्या आणखी जटिल
बेळगाव : राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावातील अनेक ग्राम पंचायतींमध्ये विकास अधिकाऱ्यांच्या (पीडीओ) जागा रिक्त आहेत. त्यामुळे गावांच्या विकासाला गती मिळालेली नाही. गावातील समस्या आणखी जटिल बनत आहेत. अकाली मृत्यू, बदली, सेवानिवृत्ती यासारख्या कारणांनी पीडीओंच्या जागा काही वर्षापासून रिक्त आहेत. या जागांवर नेमणूक अद्याप झालेली नाही. त्यामुळे गावातील समस्यांना मार्ग मिळत नाही. ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 500 ग्राम पंचायती असून काही ग्राम पंचायतींवर पीडीओंच्या जागा भरण्यासाठी प्रक्रिया होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात 65 ग्राम पंचायतींमध्ये पीडीओंच्या जागा रिक्त आहेत. काही ग्राम पंचायतींमध्ये सेवा बजावत असलेले पीडीओंचे निधन झाल्याने त्या जागाही रिक्त झाल्या आहेत.
सचिवांवरील कामाचा बोजा वाढला
काही ठिकाणी प्रभारी म्हणून पीडीओ काम पाहत आहेत. पीडीओंवर असलेली जबाबदारी ग्राम पंचायतींचे सचिव (सेक्रेटरी) पूर्ण करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सचिवांवर कामाचा बोजा वाढला आहे. परिणामी गावातील विकासकामांनाही गती मिळत नाही. पीडीओंच्या रिक्त जागांवर नेमणुकीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही हाती घ्यावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
तालुका व रिक्त असलेल्या पीडीओंच्या जागा
बेळगाव-2, अथणी-1, बैलहोंगल-3, चिकोडी-9, गोकाक-5, हुक्केरी-14, खानापूर-6, कित्तूर-2, निपाणी-5, रामदुर्ग-7, रायबाग-5, सौंदत्ती-4, व अन्य दोन ग्राम पंचायतींमध्ये प्रत्येकी 1 जागा रिक्त आहे.
पीडीओंची लवकरच नेमणूक करणार
जिल्ह्यात नव्याने रचना करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये पीडीओंची नेमणूक झालेली नाही. काही ठिकाणी पीडीआंsवर अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रिक्त असलेल्या पीडीओंच्या जागांवर नेमणुकीसाठी लवकरच कार्यवाही हाती घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी माध्यमांना दिली आहे.









