भारतानं सलामीच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीला नुसतं फाडून खाल्लं असलं, तरी अनेक वर्षांनंतर आशिया चषकासाठी पात्र ठरण्यात यशस्वी झालेल्या त्या संघाची झेप ही निश्चितच कौतुकास्पद…त्यांना प्रशिक्षक या नात्यानं मार्गदर्शन करताहेत ते भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत. गेल्या दशकभरात राजपूत यांनी कमकुवत संघांना आधार देण्याचं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रगतीची शिडी चढण्यास मदत करण्याचं काम प्रभावीरीत्या केलंय…
- 2016 व 2017 मध्ये लालचंद राजपूत यांच्याच मार्गदर्शनाखाली अफगाणिस्तानची सुरुवातीची प्रगती होऊन त्यांना पूर्ण सदस्य राष्ट्राचा दर्जा मिळाला…त्यानंतर 2018 ते 2022 पर्यंत झिम्बाब्वेचं प्रशिक्षकपद भूषविताना त्या संघाला 2022 च्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्यास मदत केली. झिम्बाब्वेच्या विकासात त्यांची रणनीती व अनुभव यांनी मोलाचा वाटा उचललाय…
- ते फेब्रुवारी, 2024 पासून संयुक्त अरब अमिरात संघाचे प्रशिक्षक आहेत. 2024 च्या आशियाई क्रिकेट कौन्सिल प्रीमियर कपदरम्यान त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली…
- ‘हे माझ्यासाठी एक आव्हान आहे. मी वेगवेगळ्या देशांना प्रशिक्षण देत आलोय आणि त्यांना पुढील स्तरावर नेण्याचा प्रयत्न केलाय. अफगाणिस्तानसोबत असताना त्यांना कसोटी दर्जा मिळाला. संयुक्त अरब अमिरात संघ 9 वर्षांनंतर आशिया चषकासाठी पात्र ठरलाय. आता आमच्यासमोर मुख्य उद्दिष्ट आहे ते 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचं’, राजपूत सांगतात…
- 2007 मध्ये इंग्लंड दौऱ्यावरील भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक म्हणून राजपूत यांनी सुऊवात केली…त्यानंतर 2007 मध्ये ग्रेग चॅपेल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आणि 2008 मध्ये गॅरी कर्स्टन यांची नियुक्ती होण्यापूर्वी भारताकडे मुख्य प्रशिक्षक नव्हता. तेव्हा संघाचं व्यवस्थापक बनवण्यात आलं ते लालचंद यांनाच. प्रत्यक्षात ही तात्पुरत्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका होती…
- एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं 2007 साली पहिला टी-20 विश्वचषक जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं…त्यानंतर राजपूत यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही संघाची जबाबदारी पेलली. तिथं कसोटी मालिकेदरम्यान निर्माण झालेल्या ‘मंकीगेट’ वादावेळी त्यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद ठरली. 2008 च्या ‘सीबी मालिके’त भारतानं ऐतिहासिक विजय मिळवला…
- 2007-08 मधील राजपूत यांचा भारतीय संघासोबतचा कार्यकाळ ही टी-20 लाटेची सुऊवात होती. ‘तेव्हा फारसं डेटाचं विश्लेषण होत नसे. पण आता 18 वर्षांनंतर सामने, ताकद, कच्चे दुवे, पॉवर हिटिंग क्षेत्रं याबद्दल प्रचंड माहिती उपलब्ध आहे. टी-20 खूप तांत्रिक बनलंय’, ते म्हणतात…
- 2008 मध्ये पहिल्या ‘आयपीएल’ हंगामात त्यांनी ‘मुंबई इंडियन्स’चं प्रशिक्षकपद भूषविलं होतं याची आठवण कित्येकांना नसेल. तो त्यांच्या प्रशिक्षक या नात्यानं कौशल्याचा पाया रचणारा काळ…
- लालचंद राजपूत हे मुंबईचे नामवंत सलामीवीर आणि देशी क्रिकेटमध्ये त्यांचा मोठा दबदबा राहिला. ते 110 प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यात त्यांनी 49.30 च्या सरासरीनं एकूण 7988 धावा केल्या तसंच 20 शतकं झळकावली…
- पण ते भारतातर्फे दोनच कसोटी सामने खेळू शकले. 1985 मध्ये श्रीलंकेविऊद्धच्या पदार्पणातील कसोटीच्या दुसऱ्या डावात त्यांनी अर्धशतक झळकावलं होतं. परंतु पुढच्या कसोटीतील अपयश त्यांची जागा रवी शास्त्राrला देऊन गेलं. त्यानंतर ते परत कसोटी संघात पोहोचू शकले नाहीत…1985 ते 87 दरम्यान राजपूत 4 एकदिवसीय सामनेही खेळले…
– राजू प्रभू









