वृत्तसंस्था/ दोहा
येथील सुहेम बिन हमाद स्टेडियमवर झालेल्या आपल्य शेवटच्या गट सामन्यात ब्रुनेई दाऊस्सलामचा 6-0 असा धुव्वा उडवूनही भारताचा 23 वर्षांखालील पुऊष फुटबॉल संघ एएफसी 23 वर्षांखालील आशियाई चषक पात्रता फेरीतून बाहेर पडला.
भारतीय संघाने त्यांच्या तीन सामन्यांतून सहा गुण मिळवले आणि दोहा येथील अब्दुल्ला बिन खलिफा स्टेडियमवर झालेल्या कतार आणि बहरिन यांच्यातील गट ‘एच’मधील सामन्याच्या निकालाची त्यांना वाट पाहावी लागली, जो यजमानांनी 2-1 असा जिंकला. एका गोलने पिछाडीवर राहूनही कतारने इंज्युरी टाइममध्ये दोन गोल केले. कतारने परिपूर्ण कामगिरीसह (तीन सामन्यांतून नऊ गुण) गटात अव्वल स्थान पटकावले, तर भारत सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला.
दुसऱ्या क्रमांकावरील चार सर्वोत्तम संघांनी (11 गटांमधून) पात्रता मिळवली, तर भारताने गटातील दुसऱ्या स्थानावरील संघांमध्ये पाचवा क्रमांक मिळवून मोहीम संपवली. मंगळवारी झालेल्या सामन्यात मिडफिल्डर विबिन मोहननने (5 व्या, 7 व्या आणि 62 व्या मिनिटाला गोल) हॅट्ट्रिक केली आणि मोहम्मद आयमेन (87 व्या मिनिटाला आणि 97 व्या मिनिटाला) असे दोन गोल केले, तर आयुष छेत्री (41 व्या मिनिटाला) याने एक गोल केला.









