आशिया चषक टी-20 स्पर्धा : बांगलादेशसाठी सोपा सामना, मात्र हाँगकाँगडून प्रतिकार अपेक्षित
वृत्तसंस्था/ अबु धाबी
येथील शेख झायेद स्टेडियमवर आज गुरुवारी बांगलादेश हाँगकाँगविरुद्ध आशिया चषकाची मोहिम सुरू करेल. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध मोठा पराभव स्वीकारावा लागल्याने हाँगकाँग संघ त्यातून अजून सावरलेला नसल्याने बांगलादेशला हा सामना आरामात जिंकण्याची संधी असेल. हाँगकाँगला पहिल्या सामन्यात 94 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी अफगाणने निर्धारित षटकांत 6 बाद 188 धावा फटकावल्या होत्या. हाँगकाँगच्या केवळ दोनच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली होती. अननुभवी असल्याने हा संघ पुन्हा एकदा दडपणाखाली असेल. त्यांच्या गोलंदाजांनाही सुधारित कामगिरी करण्याची गरज आहे, विशेषत: डेथओव्हर्समध्ये. अखेरच्या टप्प्यात अफगाण फलंदाजांनी त्यांची गोलंदाजी चोपून काढल्याने त्यांना पावणेदोनशेचा टप्पा पार करता आला होता.
बांगलादेशला अजून एकदाही आशिया चषक स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे त्या दिशेने आगेकूच करण्यासाठी विजयी प्रारंभ करण्याची त्यांना संधी मिळाली आहे, त्याचा उपयोग करून घेत मोठा विजय मिळवून स्थिरावण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. यानंतर त्यांना प्राथमिक फेरीत लंका (13 सप्टेंबर) व अफगाण (16 सप्टेंबर) या हाँगकाँगपेक्षा अनुभवी संघांविरुद्ध लढत द्यावी लागणार आहे.
तसे पाहिल्यास बांगलादेशने आशिया चषक स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले आहे. पण त्यांना चषक पटकावण्यात अपयश आले आहे. एकूण तीन वेळा (2012, 2016, 2018) त्यांनी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण प्रत्येक वेळी भारत, लंका यासारख्या बलाढ्या संघांविरुद्ध ते कमी पडल्याचे दिसून आले. लिटन दास हा या संघाचा कर्णधार असून तो पाचव्यांदा या स्पर्धेत खेळत असून या खंडीय स्पर्धेत तो प्रथमच पूर्णवेळ कर्णधार म्हणून उतरला आहे. यष्टिरक्षक व फलंदाजही असल्याने संघाला थोडी स्थैर्य मिळाले असून या संघात अनुभवी व युवा खेळाडूंचाही समावेश आहे.
नुरुल हसन तीन वर्षांच्या खंडानंतर संघात परतला असून फलंदाजी व यष्टिरक्षणासाठी त्याच्या रूपात बांगलादेशला एक पर्याय मिळाला आहे. तौहिद हृदोय मध्यफळीत आक्रमक खेळणारा फलंदाज असून मुस्तफिजूर रहमान हा त्यांचा मुख्य वेगवान गोलंदाज आहे. विशेषत: डेथओव्हर्समध्ये वैविध्यपूर्व गोलंदाजी करण्यात तो तरबेज आहे. तन्झिम हसन साकिब हा नवा चेंडू हाताळणारा गोलंदाज म्हणून पुढे आला असल्याने बांगलादेशच्या आक्रमणात समतोल निर्माण झाला आहे.
या स्पर्धेसाठी दाखल होण्याआधी बांगलादेशने लंका, पाकिस्तान व नेदरलँड्स या संघांविरुद्ध सलग तीन मालिका जिंकल्या असल्याने त्यांचा जोम व आत्मविश्वास दुणावलेला असेल. मात्र इतिहासातील निकालांचे ओझे त्यांच्या मनावर रेंगाळणार आहे. बांगलादेश संघ आयसीसी व एसीसी स्पर्धांमध्ये वारंवार ढेपाळताना दिसला आहे. आशिया कपमध्ये तर त्यांनी तीनदा अंतिम फेरी गाठली, पण शेवटी त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. दीर्घ सराव शिबिरात चांगली तयारी झाली असल्याने आपण सज्ज झालो असल्याचे कर्णधार दासने सांगितले. त्याच्या नेतृत्वाखाली आघाडी फळीने जोरदार प्रदर्शन करीत स्ट्राईकरेटही वाढवला आहे तर गोलंदाजीत आणखी खोली आली आहे.
बांग्लादेश संघ: लिटन दास (यष्टिरक्षक, कर्णधार), तन्झिद हसन, परवेझ हुसेन इमॉन, सैफ हसन, तौहीद हृदोय, जाकेर अली, शमीम हुसेन, नुरुल हसन, महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन, तस्कीन अहमद, शरीफुद्दीन इस्लाम, मोहम्मद शोरीफुल इस्लाम.
हाँगकाँग संघ: यासीम मुर्तझा (क), बाबर हयात, झीशान अली, नियाझाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएत्झी, अंशुमन रथ, कल्हान मार्क छल्लू, आयुष शुक्ला, मोहम्मद एजाझ खान, अतीक उल रहमान इक्बाल, किंचित शाह, अली हसन, शाहिद वसीफ, गझनफर मोहम्मद, वासन मोहम्मद वाहीद, एहसान खान.
सामन्याची वेळ : रात्री 8 वाजता., थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन 1 व टेन 4.









