वृत्तसंस्था / कोलंबो
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस महिला एकदिवशीय विश्वचषकात चमारी अटापटू श्रीलंकेचे नेतृत्व करेल. सहयजमान असलेल्या लंकेने आजवर झालेल्या 12 आवृत्त्यांमध्ये एकदाही अंतिम फेरी गाठली नाही. यावेळी ही मालिका खंडित करण्याचा त्यांचा इरादा असेल.
भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या आठ संघांच्या स्पर्धेसाठी श्रीलंका क्रिकेटने बुधवारी 15 सदस्यीय संघांची घोषणा केली. ज्यामध्ये हर्षिता समरविक्रमा, निलाक्षी डीसिल्वा आणि अनुष्का संजीवनी या अनुभवी त्रिकुटाचा समावेश आहे. आठ सामन्यांमध्ये चार अर्धशतकांसह 48 च्या सरासरीने 336 धावा काढत हर्षिता या वर्षी श्रीलंकेची सर्वोत्तम फलंदाज ठरली आहे तर देवमी विहंगा चार सामन्यांमध्ये 11 बळी घेवून अव्वल स्थानावर आहे.
यावर्षी आठ एकदिवशीय सामन्यांमध्ये श्रीलंकेने पाच गमावलेले आहेत. दोन जिंकले आहेत तर एकाचा निकाल लागला नाही. परदेशात न्यूझीलंडकडून 0-2 असा पराभव झाल्यानंतर श्रीलंकेला या वर्षी मे महिन्यात द. आफ्रिकेसह झालेल्या एकदिवशीय तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागला. श्रीलंका 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखालील भारताविरुद्ध त्यांचा सलामीचा सामना होईल. त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी कोलंबोला परततील.
श्रीलंका महिला संघ: चमारी अट्टापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, विश्मी गुणरथने, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, निलाक्षी डिसिल्वा, अनुष्का संजीवनी, इमेशा दुलानी, देवमी विहंगा, पियुमी वाथसाला, इनोका रणवीरा, सुगंदिका कुमारी, उदेशिका प्रबोदिनी, मल्की मदारा, अचिनी कुलसुरिया.









