केईआरसीने ग्राहकांकडून मागविली मते
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक वीज नियामक आयोगाकडून (केईआरसी) व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक वापराच्या वीज दरात वाढ करण्याचा प्रस्ताव असून केईआरसीने या संदर्भात पत्रक जारी केले आहे. ग्राहकांना याबाबत मते सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने जीएसटीत कपात केल्यानंतर सर्वांना जीवनावश्यक वस्तू कमी किमतीत मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, याच दरम्यान वीज पुरवठा कंपन्यांनी कृषी पंपसेटच्या वीज दरात कपात करून औद्योगिक आणि व्यावसायिक वीज दर प्रतियुनिट 10 पैशांपासून 1 रुपयांपर्यंत वाढ करावी, अशी विनंती केली होती. मात्र, एफकेसीसीआय आणि कासियासह अनेक संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे.
दोन वर्षापूर्वी केईआरसीने वीज दरवाढ करण्यापूर्वी राज्य सरकारना पत्र पाठवून औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांवरील क्रॉस सबसिटी कमी करण्याची विनंती केली होती. मात्र, राज्य सरकारने संमती दिली नव्हती. मार्च महिन्यात केईआरसीने 10 एचपी पंपसेटसाठी पुरविल्या जाणाऱ्या प्रतियुनिट वीजदरात 1.50 रुपयाने वाढ केली होती याच कालावधीत औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांना प्रतियुनिट वीज दरात 30 पैसे ते 3 रुपयांपर्यंत कपात केली होती. यामुळे राज्य सरकारवर अतिरिक्त भार पडत आहे.
अर्थसंकल्पात सरकारने केवळ 16,021 कोटी रु. दिले आहेत. राज्य सरकारने अतिरिक्त 2,36,247 कोटी रु. दिले तरी आणखी 1,214.12 कोटी रुपयांची तूट येईल. याची भरपाई करण्यासाठी औद्योगिक आणि व्यावसायिक वापराच्या वीज दरात वाढ करण्याची विनंती करण्यात आली आहे.









