वृत्तसंस्था/ नॉर्वे
स्वीडनच्या नवीन आरोग्यमंत्री एलिझाबेथ लॅन एका परिषदेदरम्यान बेशुद्ध पडल्यानंतर व्यासपीठावरच कोसळल्या. त्यांच्यावर त्वरित उपचार केल्यानंतर त्या पुन्हा परिषदेत सामील झाल्या. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. माजी आरोग्यमंत्री इको अँकरबर्ग जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर मंगळवारी लॅन ह्या नवीन आरोग्यमंत्री झाल्या. लॅन यांची मीडियाशी ओळख करून देण्यासाठी विशेष परिषद आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन आणि इतर मंत्रीदेखील याप्रसंगी उपस्थित होते. मात्र अचानक त्या व्यासपीठावर कोसळल्यामुळे परिषदेत गोंधळ निर्माण झाला.









