खेड / राजू चव्हाण :
अपघातांच्यादृष्टीने शापित बनलेला मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नवा जगबुडी पूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भरणे ग्रामपंचायतीकडून जुन्या पुलाखालीच कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्याने नवा जगबुडी पूल आता दुर्गंधीच्या फेऱ्यात अडकला आहे. कुजलेल्या कचऱ्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना नाक मुठीत धरुन मार्गस्थ व्हावे लागत आहे. आरोग्यावरही धोक्याची टांगती तलवार कायम आहे.
नवा जगबुडी पूल सुरुवातीपासून समस्यांच्या गर्तेतच अडकला आहे. सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे नव्या जगबुडी पुलाबाबत झडणाऱ्या चर्चा थांबेनाशा झाल्या आहेत. यासाठीच्या राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या उपाययोजना फोल ठरत आहेत. पोलीस प्रशासनाचीही डोकेदुखी कायम आहे.
भरणे परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीकडे हक्काची जागा नाही. यामुळे भरणे येथील जुन्या जगबुडी पुलाखालील मोकळ्या जागेत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली आहे. या ठिकाणी धुमसणाऱ्या कचऱ्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसामुळे टाकला जाणारा कचरा कुजत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
जागेअभावी कचऱ्याची विल्हेवाट लावायची कुठे, असा प्रश्न ग्रामपंचायतीला वर्षानुवर्षे भेडसावत आहे. याचमुळे जुन्या जगबुडी पुलाखालील मोकळ्या जागेत कचऱ्याची विल्हेवाट लावून आला दिवस ढकलत प्रक्रियेचे सोपस्कार पार पाडत आहे. यामुळे नव्या जगबुडी पुलावरील दुर्गंधीचा फेरा कायम आहे. या गंभीर बाबीची दखल घेणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- दुर्गंधीचा वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास कशासाठी?
भरणे ग्रामपंचायतीने कचरा विल्हेवाटीसाठी पर्यायी जागेचाच वापर करायला हवा. जागेसाठी ग्रामस्थांकडून जमा होणाऱ्या कराच्या रक्कमेचा वापर होणे आवश्यक आहे. जुन्या जगबुडी पुलाजवळ कचऱ्याची विल्हेवाट लावणे कितपत योग्य आहे, कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास वाहनचालकांसह पादचाऱ्यांना का, असे प्रश्न सामाजिक कार्यकर्ते प्रीतम पाटणे यांनी उपस्थित करत यास वेळीच प्रतिबंध घालण्याची मागणी केली आहे.








