प्रश्नांबाबत चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्यासोबत चर्चा केली होती
कोल्हापूर : वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संचालकांनी प्रश्न उपस्थित करायचे नसतात हे विरोधकांच्या लक्षात आले पाहिजे. त्यांच्या प्रश्नांबाबत चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यामुळे त्यांनी सभेमध्ये परिपक्वता दाखवणे अपेक्षित होते असे आमदार सतेज पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
आमदार पाटील म्हणाले, चेअरमन नविद मुश्रीफ यांनी गोकुळची सभा अगदी संयमाने हाताळली. सभेमध्ये आलेल्या 49 प्रश्नांपैकी 25 प्रश्न हे विरोधकांचे होते. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे कार्यकारी संचालक यांनी सभेमध्ये दिली आहेत. तसेच त्यांच्या प्रश्नांबाबत चेअरमन मुश्रीफ यांनी दोन दिवसांपासून त्यांच्यासोबत चर्चा केली आहे.
संचालकांना सभेमध्ये प्रश्न विचारायचे नसतात हे त्यांच्या लक्षात आले पाहिजे, असा टोला आमदार पाटील यांनी विरोधकांना लगावला. ते पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील स्वाभिमानी जनतेने स्वत:चे घर भरणाऱ्यांना डावलले आहे. त्यामुळे आम्ही गेल्या पाच वर्षात सर्वांना विश्वासात घेऊन स्वच्छ व पारदर्शी कारभार केला आहे.
सर्वसामान्य दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोन रुपये दरवाढ देऊ असे सांगितले होते. मात्र 13 रुपये दरवाढ आम्ही दिली आहे. गोकुळची निवडणुक अजून लांब आहे. त्यापूर्वी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या काळात अजुन बरेच पाणी वाहणार आहे. त्यामुळे आत्ताच निवडणुकीबाबत बोलणे योग्य नाही. दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी आम्ही सगळे सज्ज असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
समाजासमोर चुकीची माहिती देऊ नये
गेल्या चार वर्षात गोकूळ सभेत झालेला गोंधळ लक्षात घेता आजची सभा खेळीमेळीत व शांततेत पार पडली. माझ्या प्रास्ताविकातच सभासदांना गोकुळचा कारभार समजला. हेच आजच्या सभेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. विरोधकांना बोलण्याची संधी दिली होती. त्यामुळे त्यांनी समाजासमोर चुकीची माहिती देऊ नये. आलेल्या लेखी प्रश्नांसह त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असल्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.








