वृत्तसंस्था/ लिव्हरपूल (ब्रिटन)
येथे सुरू असलेल्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या महिला मुष्टीयोद्ध्या निखत झरीन आणि जस्मिन लंबोरीया यांनी आपल्या वजन गटातून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. मात्र सनामाच्या आणि साक्षी यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
मंगळवारी महिलांच्या 51 किलो वजन गटातील झालेल्या लढतीत आतापर्यंत दोनवेळा विजेतेपद मिळविणारी भारताची निखत झरीने जपानच्या युना निशांकाचा 4-1 अशा गुण फरकाने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या लढतीमध्ये जपानच्या 21 वर्षीय युनाने पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये निखतला कडवी लढत दिली. यामध्ये युनाने पहिल्या फेरीअखेर निखतवर 3-2 अशी आघाडी मिळविली होती. पण दुसऱ्या फेरीत निखतने आपल्या जबरदस्त ठोशाच्या जोरावर निशांकाचा 4-1 असा पराभव केला. या लढतीतील शेवटच्या तीन मिनिटांच्या कालावधीत पंचांनी निशांकाला वारंवार समज दिला. आता निखत विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत तिसरे पदक मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. उपांत्यपूर्व फेरीत निखतची लढत तुर्कीच्या बुसे नाझ बरोबर होणार आहे. तुर्कीच्या बुसेने यापूर्वी दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक तसेच 2022 च्या विश्व लाईट प्लायव्हेट गटातील विजेतेपद मिळविले होते.
पुरूषांच्या विभागात भारतीय स्पर्धकांनी साफ निराशा केली. 75 किलो गटात सुमित कुंडू, 60 किलो गटात सचिन सिवाच तसेच 90 किलो वरील वजन गटात नरेंद्र बेरवाल यांचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. 75 किलो गटात बल्गेरीयाच्या रेमी किवानने सुमित कुंडूचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत पुढील फेरी गाठली. पुरूषांच्या 60 किलो वजन गटात कझाकस्तानच्या झीक्सेनने भारताच्या सचिन सिवाचचा 4-1 तसेच 90 किलो वरील गटात इटलीच्या लेंझीने भारताच्या नरेंद्र बेरवालचा 4-1 अशा गुणांनी पराभव केला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 20 सदस्यांच्या भारतीय मुष्टीयुद्ध संघातील निम्यापेक्षा अधिक स्पर्धकांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
महिलांच्या 57 किलो वजन गटात भारताच्या जस्मिन लंबोरीयाने ब्राझीलच्या ज्युसेलीन रोमुचा 5-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. जस्मिन आता विश्वमुष्टीयुद्ध स्पर्धेत पहिले पदक मिळविण्याच्या दृष्टिने वाटचाल करीत आहे. महिलांच्या विभागातील 54 किलो वजन गटात भारताच्या साक्षी चौधरीला तुर्कीच्या अकबासने पराभूत केले. सनामाच्या चानु आणि निरज फोगट यांचे आव्हानही संपुष्टात आले. कझाकस्तानच्या बोगडेनोव्हाने सनामाच्याचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. 65 किलो वजन गटात इंग्लंडच्या सेचा हिकेने निरज फोगटवर 5-0 अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले.









