चिनी राजदूताने भारताच्या बाजूने मांडली भूमिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लादण्यात आलेल्या आयातशुल्कामुळे भारत आणि चीन दोन्ही देश त्रस्त आहेत. ट्रम्प यांनी चीनला चर्चेसाठी टेबलवर येण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली आहे, परंतु भारताच्या बाबतीत अजिबात नरमाई दाखविलेली नाही. अशास्थितीत आता चीन आणि भारत आघाडी करत अमेरिकेच्या आयातशुल्काला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. चीनचे राजदून जू फेइहोंग यांनी ट्रम्प प्रशासानकडून भारतावर लादण्यात आलेल्या 50 टक्के आयातशुल्काचा चीन विरोध करत असल्याचे म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांच्या या अरेरावीच्या विरोधात भारत आणि चीनने एकत्र येत या आव्हानाला तोंड देण्यासाठी स्वत:च्या आर्थिक संबंधांना वाढवावे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. भारत आणि चीन दोन्ही देश दहशतवादाचे पीडित आहेत आणि चीन या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारतासमवेत जागतिक समुदायासोबत काम करण्यास तयार असल्याचे फेइहोंग यांनी म्हटले आहे. भारतात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे.
भारत आणि चीनदरम्यान सीमा मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण सहमती झाली आहे आणि दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध कुठल्याही तिसऱ्या पक्षामुळे प्रभावित झालेले नाहीत असे त्यांनी वक्तव्य केले आहे. ही बाब त्यांनी स्पष्टपणे पाकिस्तानकडे इशारा करत म्हटले आहे. पाकिस्तानशी चीनची जवळीक भारतासोबतच्या संबंधांना प्रभावित करणार नसल्याचे स्पष्ट संकेत चीनच्या राजदूताने दिले आहेत.
अमेरिकेच्या शुल्कावर कठोर टीका
फेइहोंग यांनी स्वत:च्या भाषणात अमेरिकेच्या शुल्क धोरणावर सडकून टीका केली. अमेरिका विविध देशांकडून अधिक खर्च वसूल करण्यासाठी शुल्काचा अस्त्र म्हणून वापर करत आहे. भारत-चीन दोन उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी या स्थितीला सामोरे जाण्यासाठी परस्परांसोबत सहकार्य करायला हवे. व्यापार युद्ध अमेरिकेने सुरु केले होते. आंतरराष्ट्रीय व्यापार हा परस्परांना पूरक असायला हवा आणि सहकार्याच्या दिशेने नेण्यात यावा. अमेरिका दीर्घकाळापासून मुक्त व्यापाराचा लाभ उचलत आहे. परंतु आता तो आयातशुल्काचा अस्त्र म्हणुन वापर करत आहे. अमेरिका भारतावर 50 टक्क्यांपर्यंत आयातशुल्क लादत आहे. हे चुकीचे आणि अविवेकपूर्ण आहे. भारत आणि चीनने मिळून या धोक्याला तोंड देण्याच्या पद्धती शोधायला हव्यात असे त्यांनी म्हटले आहे.
परस्पर सहकार्य वाढविण्यावर जोर
दोन्ही देशांनी आर्थिक आणि व्यापार क्षेत्रात सहकार्य वाढवायला हवे. आमच्याकडे 2.8 अब्ज लोक आहेत. आमच्या अर्थव्यवस्था मोठ्या आहेत, बाजारपेठा विशाल आहेत आणि आमच्याकडे कठोर मेहनत करणारे लोक आहेत. आमच्या अर्थव्यवस्था परस्परांना पूरक आहेत असे म्हणत फेइहोंग यांनी एससीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीदरम्यान चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या वक्तव्यांची आठवण करून दिली. चीन आणि भारत विकासाच्या एका विशेष टप्प्यात आहेत, दोन सर्वात मोठ्या आणि उदयोन्मुक अर्थव्यवस्थांच्या स्वरुपात चीन आणि भारताने विकास आणि परस्पर सहकार्य तसेच परस्परांच्या यशाला चालना देण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे असे जिनिंपग यांनी म्हटले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत-चीन सहकार्य 21 व्या शतकाला आशियाचे शतक ठरवणार असल्याचे उद्गार काढले होते. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आर्थिक सहकार्याच्या महत्त्वावर जोर दिला होता असे फेइहोंग यांनी नमूद पेले.









