उपचारासाठी प्रथम सिव्हीलमध्ये आणले : मानसोपचार तज्ञांकडून समुपदेशन : प्रशासनाने घेतली खबरदारी
बेळगाव : सदेह वैकुंठाला जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनंतपूर, तालुका कागवाड येथील एका कुटुंबातील 5 जणांवर मानसोपचार तज्ञांकडून उपचार केले जात आहे. रविवारी अथणी पोलिसांनी त्यांना सिव्हील हॉस्पिटलला आणले. प्राथमिक उपचारानंतर सिव्हीलमधून त्यांना धारवाडला हलविल्याची माहिती मिळाली आहे. तुकाराम पांडुरंग इरकर (50), सावित्री तुकाराम इरकर (50), वैष्णवी रमेश इरकर (23), रमेश तुकाराम इरकर (30), मायेव्वा बाळू शिंदे (35) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी रविवारी त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलला आणले. बिम्समधील मानसोपचार तज्ञ डॉ. चंद्रशेखर यांनी त्यांची तपासणी केली.
8 सप्टेंबर रोजी हरियाणामधील वादग्रस्त रामपालबाबा यांचा वाढदिवास आहे. त्याच दिवशी बाबा आम्हाला सदेह वैकुंठाला घेऊन जाणार आहेत, असे या कुटुंबीयांनी जाहीर केले होते. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. चिकोडीचे प्रांताधिकारी सुभाष संपगावी, अथणीचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत मुन्नोळी व कौवलगुड येथील श्री अमरेश्वर महाराज आदींनी अनंतपूरला भेट देऊन या कुटुंबीयांची समजूत काढली होती. सदेह वैकुंठाचा प्रवास शक्य नाही. त्यामुळे तो विचार मनातून काढून टाका, असा सल्ला अनेक तज्ञांनी या कुटुंबीयांना दिला होता. तरीही रामपाल महाराज सुक्ष्मरुपाने येऊन आम्हाला सांगितले आहेत. 8 सप्टेंबर रोजी वैकुंठाला जाण्यासाठी तयार रहा, मी स्वत: तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला घेऊन जातो, असा निरोप दिला आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. अशी या कुटुंबीयांची ठाम भूमिका होती.
पाच जणांना प्रथम सिव्हीलमध्ये आणले
काहीतरी अनर्थ घडू नये यासाठी अथणी तालुका प्रशासनाने या सर्व पाच जणांना रविवारी ताब्यात घेऊन उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलला आणले. येथील मानसोपचार तज्ञांनी त्यांची समजूत काढली. सदेह वैकुंठाला जाण्याच्या भ्रमातून बाहेर पडा, असा सल्ला दिला. वैकुंठाला जाण्यासाठी आत्महत्या करणार का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत आपण आत्महत्या करणार नाही. मात्र ज्या बाबांवर आपला विश्वास आहे. बाबा आमचा विश्वास तोडणार नाहीत ते आम्हाला वैकुंठाला नेणारच यावर ते ठाम होते. शेवटी सर्व कुटुंबीयांची वैद्यकीय तपासणी करून डॉ. चंद्रशेखर यांनी त्यांची समुपदेशनही केली. पुढील उपचारासाठी रविवारी त्यांना धारवाडला हलविण्यात आले आहे. यासंबंधी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. इरण्णा पल्लेद यांच्याशी संपर्क साधला असता रविवारी हे कुटुंबीय उपचारासाठी सिव्हीलमध्ये आले होते. त्यांना धारवाडला हलविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.









