सोमवारी पहाटे 5.30 वाजता महानगरपालिकेच्या श्रीमूर्तीचे सर्वात शेवटी विसर्जन
बेळगाव : शनिवारी सायंकाळी 5 वा. सुरू झालेली शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक सोमवार दि. 8 रोजी पहाटे 5.30 वाजेपर्यंत चालली. तब्बल दोन दिवस चाललेल्या विसर्जन मिरवणुकीमुळे प्रशासन यंत्रणांवर ताण आला. दरवर्षी विसर्जनाची वेळ वाढतच चालली असल्याने बेळगावकरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील सर्व सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर शेवटी 5.30 वा. महानगरपालिकेच्या श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
हुतात्मा चौकात मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी सार्वजनिक श्रीमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. काही मंडळांनी मुख्य मिरवणुकीत सहभागी न होता शनिवारी दुपारीच कपिलेश्वर तलावात श्रीमूर्तीचे विसर्जन केले. मुख्य विसर्जन मिरवणूक रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौक, रामलिंगखिंड गल्ली, सम्राट अशोक चौक, टिळक चौक, शनि मंदिर, कपिलेश्वर ब्रिजवरून कपिलतीर्थ खाली कपिलेश्वर तलावाकडे सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेण्यात आल्या.
विसर्जन मिरवणूक लवकर सुरू करून रात्री लवकर पूर्ण करावी, यासाठी प्रशासनाकडून दरवर्षी सातत्याने बैठका घेऊन मंडळांना सूचना केल्या जातात. त्यावेळी अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन केले जाईल, असे सांगण्यात येते. पण प्रत्यक्षात त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. रात्री लवकर विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यास शहरातील गणेशभक्तांना श्रीमूर्ती पाहणे सोपे होते. पण आता मध्यरात्री तर दूरच तब्बल दुसऱ्या दिवशीपर्यंत विसर्जन मिरवणूक चालत असल्याने उत्सवाचा उन्माद होत आहे. काही ठिकाणी हेस्कॉमकडून वीजपुरवठा खंडित केला जातो. पण विसर्जन मिरवणूक लवकर संपत नसल्याने शहराच्या बहुतांश भागाला अंधारात रहावे लागत आहे.
शेवटी श्रीमूर्ती विसर्जन करण्यासाठी मंडळांमध्ये सुरू असलेली चढाओढ मिरवणूक लांबण्यास कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे. डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे गेल्या अनेक वर्षांपासून सांगितले जात आहे. गतवर्षी विसर्जन मिरवणूक 30 तास चालली होती. पण यंदा मंडळांमध्ये चढाओढ कारणीभूत ठरल्याने यंदाची विसर्जन मिरवणूक गतवर्षीपेक्षा लांबली. मंडळांच्या श्रीमूर्तीचे पहाटे 5 च्या दरम्यान विसर्जन पूर्ण झाले. यानंतर शेवटी 5.30 वा. मनपाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. विसर्जनापूर्वी मनपा आयुक्त शुभा बी. यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला. गेल्या महिनाभरापासून गणेशोत्सवाच्या तयारीत गुंतलेल्या अधिकाऱ्यांनी जल्लोषपूर्ण वातावरणात बाप्पांना निरोप दिला.









