मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे मत : जिल्हास्तरीय दसरा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
बेळगाव : खेळामध्ये जय-पराजयला महत्त्व नसून सहभागाची भावना महत्त्वाची आहे. खेळासोबत अभ्यासाचे धडे घेतल्यास जीवनात खिलाडूवृत्ती विकसित होऊ शकते. आपल्याकडे प्रतिभेची कमतरता नाही. खेळात सहभागी झालेले प्रत्येकजण प्रतिभावान असून क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जेव्हा खेळाडूंना प्रेरणा मिळते तेव्हा ते नक्कीच यशस्वी होतात, असे मत महिला व बाल विकास कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. जिल्हा क्रीडांगणावर जिल्हा प्रशासन, जि. पं., युवा सबलीकरण व क्रीडा खात्याच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय दसरा क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आपल्यालाही खेळाची खूप आवड होती. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत सहभागी होऊन खेळाचा आनंद घेतला आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या संधी वारंवार मिळत नाहीत. यासाठी प्रत्येकाने क्रीडा उपक्रमांचा सदुपयोग करून घ्यावा. मोबाईल, इंटरनेट व रँक मिळविण्याच्या वृत्तीमुळे खेळ कसा खेळावा याचा विसर पडला आहे. पण स्पर्धांतून विकसित झालेली शिस्त, सहकार्य व लढाऊ भावना जीवनात यश मिळवून देते, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार आसिफ सेठ, क्रीडा खात्याचे उपसंचालक बी. श्रीनिवास यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी, क्रीडापटू उपस्थित होते.









