रत्नागिरी :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधासंदर्भात तक्रारी येत होत्या. मात्र वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधांमुळे शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांमध्ये चांगला फरक पडल्याचे दिसून येत आहे. जिल्हा रुग्णालयात 2021-22 या वर्षात बाह्य रुग्णांची संख्या 89 हजार 811 इतकी होती. 2024-25 या वर्षात बाह्य रुग्णांची संख्या 2 लाख 2 हजार 677 इतकी झाली आहे. तर मोठ्या शस्त्रक्रियांची संख्या 983 वरून आता 2 हजार 592 इतकी झाली आहे. कुत्र्यांचा चावा तसेच सर्प आणि विंचूदंश यासाठी खासगी रुग्णालयापेक्षा शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा शासकीय रुग्णालयात आता तिसऱ्या वर्षाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वऊपी सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची संख्या आता 22 झाली आहे. महाराष्ट्रातील एक उत्तम आणि सर्व सोयीसुविधांनीयुक्त असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून शहरातील महाविद्यालयाकडे पाहिले जाते. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा हा शैक्षणिक हब म्हणून ओळख मिळवण्याच्या दृष्टीने यशस्वी प्रवास सुरू झाला असल्याचे मत सामंत यांनी व्यक्त केले.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासोबतच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्याही आता अकराशेच्या पुढे गेलेली आहे. त्यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच लोणेरेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच रत्नागिरीत सुऊ करण्यात येणार आहे. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न इथेच निकाली काढण्यात येतील. तसेच संस्कृत उपकेंद्रात सुरू असलेले योग पदवी अभ्यासक्रम, आयटीआयमधील विविध विषय यासाठी प्रवेशांची संख्या वाढते आहे. आयटीआयमधील विद्यार्थ्यांना आवश्यक साधनसामग्रीसाठी आता आपण विशेष निधीतून खर्च करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.








