तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा 342 धावांनी विक्रमी विजय : आफ्रिकेला 72 धावांत गुंडाळले
वृत्तसंस्था/ साऊथहॅम्प्टन
इंग्लंडने वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवताना रविवारी झालेल्या तिसऱ्या व शेवटच्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 342 धावांनी पराभव केला. एकदिवसीय इतिहासातील धावांच्या फरकाने हा सर्वात मोठा विजयाचा विक्रम आहे. यापूर्वी 2023 मध्ये भारताने श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव केला होता.
रविवारी दक्षिण आफ्रिकेने तब्बल 27 वर्षानंतर इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेनं तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले होते. मात्र, तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे मॅचमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करत जिंकला आहे. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 72 धावांत ऑलआऊट झाला. 18 धावांत 4 बळी घेणाऱ्या इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले तर आफ्रिकेचा केशव महाराज मालिकावीर ठरला.
इंग्लंडचा धावांचा डोंगर
प्रारंभी, आफ्रिकेने रोझ बाउल स्टेडियमवर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बेन डकेट आणि जेमी स्मिथ यांनी इंग्लंडला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनीही 8 व्या षटकात अर्धशतकी भागीदारी केली. डकेट 31 धावा काढून बाद झाला. त्याच्यानंतर स्मिथने अर्धशतक ठोकले आणि संघाला 100 धावांचा टप्पा ओलांडून दिला. जेमी स्मिथ 62 धावा काढून बाद झाला. यानंतर जो रुटने 6 चौकारासह 100 तर जेकेब बेथेलने 82 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारासह 110 धावांची खेळी साकारली. याशिवाय, जोस बटलरने नाबाद 62 धावांची आक्रमक खेळी साकारली. या जोरावर इंग्लंडने 50 षटकांत 5 गडी गमावत 414 धावा केल्या.
इंग्लंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना अफ्रिकेचे खेळाडू हजेरी लावून परतत होते. यामुळे पहिल्या 15 षटकातच अफ्रिकेचा पराभव निश्चित झाला होता. एडन मार्करम आणि वियान मुल्डर यांना आपलं खातेही खोलता आले नाही. तर रायन रिकेल्टन 1, मॅथ्यू ब्रीट्झ 4, ट्रिस्टन स्टब्स 10, डेवॉल्ड ब्रेविस 6, केशव महाराज 17, कोडी युसूफ 5 धावा करून तंबूत परतले. बॉशने सर्वाधिक 20 धावा केल्या. यानंतर आफ्रिकेचा डाव 20.5 षटकांत 72 धावांत आटोपला. जोफ्रा आर्चरने या सामन्यात भेदक गोलंदाजी करताना 4 बळी घेतले तर आदिल रशीदने 3 बळी घेतले.
आफ्रिकेचा मालिकाविजय
आफ्रिकेने अलीकडेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत बलाढ्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करत आयसीसीची स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती. त्यानंतर त्यांनी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन मॅचमध्ये विजय मिळवत मालिका जिंकली. मात्र, तिसऱ्या सामन्यात इंग्लंडनं पलटवार करत आफ्रिकेला पराभूत केले. विशेष म्हणजे, तब्बल 27 वर्षानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
इंग्लंडचा वनडेतील सर्वात मोठा विजय
इंग्लंडने मिळवलेला विजय हा वनडे क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला. याआधी इंग्लंडचा सर्वात मोठा विजय 2018 मध्ये आला होता, जेव्हा त्यांनी ऑस्ट्रेलियाला 242 धावांनी हरवले होते. दुसरीकडे, एकदिवसीय सामन्यांमध्ये आफ्रिकेचा धावांनी हा सर्वात मोठा पराभव आहे. आफ्रिकेचा याआधीचा सर्वात मोठा एकदिवसीय पराभव गेल्या महिन्यात मॅके येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 276 धावांनी झाला होता.
वनडेत धावांच्या बाबतीत मोठे विजय –
- इंग्लंड 342 धावांनी विजयी वि द.आफ्रिका
- भारत 317 धावांनी विजयी वि श्रीलंका
- ऑस्ट्रेलिया 309 धावांनी विजयी वि नेदरलँड्स
- झिम्बाब्वे 304 धावांनी विजयी वि अमेरिका
- भारत 302 धावांनी विजय वि श्रीलंका









