पणजी : शैक्षणिक क्षेत्रातील मृत्यू-आत्महत्या रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने 12 सदस्यांची समिती नेमली आहे. त्या संदर्भातील आदेश उच्च शिक्षण अवर सचिव सफल शेट्यो यांनी जारी केला आहे. बिट्स पिलानीमधील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यामुळे आणि या आधीही तेथे काहीजणांचे मृत्यू घडल्याची दखल घेऊन सरकारने समिती गठीत केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार ही समिती नेमल्याचे सांगण्यात आले.
ही समिती विविध शिक्षण केंद्रात, संस्थांत जाऊन विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा आढावा घेणार असून काहीतरी वेगळे आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याचे समुपदेशन करणार आहे. मानसिक आरोग्य आणि सुरक्षा चांगली ठेवण्यासाठी समितीतर्फे मार्गदर्शन, व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. विद्यार्थी-पालक आणि इतर कोणाकडूनही तक्रारी आल्या असतील तर समिती त्याची दखल घेऊन त्यावर उपाययोजना करणार आहे. गरजेनुसार शिक्षण केंद्राला काही शिफारशी करणार आहे. विद्यार्थीवर्गाचे कल्याण व्हावे आणि त्यांना आनंदी ठेवण्यासाठी समितीर्फे सर्व ते प्रयत्न करण्यात येणार आहेत. तेथे कोणतीही समस्या असेल तर त्याची दखल समिती घेणार असून पुढील कार्यवाही करणार आहे.








