रविवारी सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरूच
खानापूर : तालुक्यातील यडोगा येथे शनिवार दि. 6 रोजी गणपती विसर्जनासाठी गेलेला युवक संजय ऊर्फ शुभम यल्लाप्पा कुप्पटगिरी (वय 18 रा. यडोगा) हा बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी 12.30 च्या दरम्यान घडली. शनिवारी आणि रविवारी मृतदेहाचे शोधकार्य सुरू होते. मात्र अद्याप तो हाती लागला नसल्याने सोमवारी सकाळी 7 पासून पुन्हा शोधकार्य हाती घेण्यात येणार असल्याचे अग्निशमन दलाचे सचिन शिंदे यांनी सांगितले. यडोगा येथील युवक संजय कुप्पटगिरी हा गणपती विसर्जनासाठी गेला होता. नदीवरील गणपतीची पूजा झाल्यानंतर गणपती विसर्जनासाठी तो मलप्रभा नदीत गेला. मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने तो बुडाला.
लागलीच युवकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा जोरदार प्रवाह असल्याने तो वाहत जावून बुडाला. याबाबतची माहिती नंदगड पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत शोध लागला नव्हता. त्यामुळे पुन्हा रविवारी सकाळी 8 वाजता शोधकार्य सुरू करण्यात आले. खानापूर अग्निशामक दलाचे जवान तसेच बेळगाव येथील एसडीआरएफचे जवान बाहुबली अक्कीवाड यांच्या नेतृत्वाखाली शोध कार्य सुरू आहे. नंदगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक एस. सी. पाटील, उपनिरीक्षक शहाहुसेन बदामी, पांडुरंग तुरमुडी यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र रविवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत संजय याचा शोध लागला नाही. त्यामुळे पुन्हा सोमवारी सकाळी शोधकार्य हाती घेण्यात येणार आहे.









