पक्षाला फुटण्यापासून वाचवण्यासाठी घेतला निर्णय
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. पक्षात त्यांच्यावर होत असलेल्या सततच्या टीकेमुळे इशिबा यांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जाते. याशिवाय जुलैमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे त्यांना धक्का बसला. त्यांच्या पदत्यागामध्ये वेगवेगळी कारणे सांगितली जात असली तरी त्यांनी स्वत: अद्याप याबाबत ठोस कारण स्पष्ट केलेले नाही.
जपानी टीव्हीच्या वृत्तानुसार, पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर राजकीय जबाबदारी घेण्याची मागणी केली होती. इशिबा यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. तथापि, पदभार स्वीकारल्यापासून त्यांना सतत आव्हानांचा सामना करावा लागत होता. तसेच, गेल्या एका महिन्यापासून पक्षाच्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाव आणला जात होता.
पक्षफुटीच्या भीतीने पदत्याग
लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) पक्षात लवकरच नेतृत्व निवडणुका घ्यायच्या की नाही यासंबंधीचा निर्णय सोमवारी घेतला जाणार होता. हा निर्णय शिगेरू इशिबा यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावासारखा असल्यामुळे जपानी पंतप्रधानांनी या बैठकीपूर्वीच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. शिगेरू इशिबा यांनी पक्ष फुटण्यापासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही बोलले जात आहे. लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष लवकरच पक्षात नेतृत्वासाठी निवडणुका घेण्याचा निर्णय घेणार होता. इशिबा यांना भीती होती की जर त्यांनी विरोध केला तर पक्षाचे दोन तुकडे होऊ शकतात. म्हणून, त्यांनी यापूर्वीच पद सोडण्याचा निर्णय घेतला.
संसदीय निवडणुका राजीनाम्याचे कारण
गेल्या महिन्यात जपानमध्ये संसदीय निवडणुका झाल्या. यामध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. 248 जागांच्या वरिष्ठ सभागृहात बहुमत न मिळाल्यामुळे सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या पराभवापासून इशिबा पक्षातील उजव्या विचारसरणीच्या गटाच्या निशाण्यावर होते. ते सतत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. याशिवाय, जपानमधील एक मोठा वर्ग अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराबद्दलही त्यांच्यावर नाराज असल्यामुळे अखेर रविवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.









