मुंबई / प्रतिनिधी
मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती व उद्योगपती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे. मुंबई पोलिसांनी 60.48 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात ही नोटीस जारी केली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाने सांगितले की, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे वारंवार होणारे परदेश दौरे लक्षात घेता, तपासात अडथळा येऊ नये म्हणून ही लूकआउट नोटीस बजावण्यात आली आहे. बहुतेक केसमध्ये लूकआउट नोटीस ही तपास यंत्रणांकडून फरार व्यक्तींसंदर्भात वापरली जाते. पोलीस ज्या व्यक्तीचा माग घेत आहे, अशी व्यक्ती परदेशात कुठे प्रवास करते यासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी ही नोटीस जारी केली जाते. या नोटीसचा वापर आंतरराष्ट्रीय सीमांवर इमिग्रेशनच्या तपासणीसंदर्भात करता येतो. तसेच या नोटीसच्या माध्यमातून फरार असणारी व्यक्ती परदेशात जाणार नाही, यासंदर्भातील सतर्कता तपास यंत्रणा किंवा पोलीस घेत असतात. समजा जर, एखाद्या प्रकरणामध्ये तपास सुरू असताना तपासाशी संबंधित प्रमुख संशयित आरोपी किंवा व्यक्ती देश सोडून पळून जाऊ नये यासाठी ही नोटीस जारी केली जाते. इमिग्रेशनचे अधिकारी या नोटीसच्या आधारे आंतरराष्ट्रीय विमानतळे किंवा समुद्र किनाऱ्यांवर संबंधित व्यक्तीला या नोटीसच्या आधारे प्रवासाला मज्जाव करू शकतात.
लूकआउट नोटीस जारी केल्यानंतर ब्युरो ऑफ इमिग्रेशनला (बीओआय) यासंदर्भातील माहिती संबंधित तपास यंत्रणांकडून दिली जाते. संबंधित यंत्रणांना आवश्यक असणारी माहिती न देताच या प्रकरणामधील प्रमुख व्यक्ती देश सोडून निघून जाण्याची शक्यता असून अशा व्यक्तीला रोखण्यात यावं यासंदर्भातील या सूचना असतात. यानंतर बीओआयकडून ही माहिती इमिग्रेशनच्या त्या अधिक्रायांना पाठवली जाते, जे महत्त्वाची विमानतळं, बंदरं किंवा देशाबाहेर जाण्राया इतर मार्गांशी संबंधित चेकपॉइण्ट्सवर तैनात असतात. या अधिकाऱ्यांना देश सोडून पळून जाण्याची शक्यता असण्राया व्यक्तीसंदर्भातील सर्व माहिती तसेच प्रकरणाची माहिती देऊन अलर्ट जारी करण्यात येतो.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 14 ऑगस्ट रोजी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक असलेले दीपक कोठारी हे तक्रारदार असून त्यांनी आरोप केला आहे की, त्यांची भेट एका सामान्य मित्रामार्फत राज कुंद्रा याच्याशी झाली होती. त्यानंतर, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांनी त्यांची कंपनी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूकीची मला ऑफर दिली होती. ही ऑफर देताना मासिक परतावा आणि मुद्दल परतफेड करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सुरुवातीला कर्ज आणि नंतर गुंतवणुकीचे आमिष दाखवून माझे 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
दीपक कोठारी यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी 2015 मध्ये दोन हप्त्यांमध्ये रक्कम हस्तांतरित केली होती, एप्रिलमध्ये 31.95 कोटी आणि सप्टेंबरमध्ये 28.53 कोटी. ही संपूर्ण रक्कम बेस्ट डील टीव्हीच्या बँक खात्यात गेली. परंतु 2016 मध्ये शिल्पा शेट्टी हिने कंपनीचा राजीनामा दिला. नंतर दुस्रया गुंतवणूकदारासोबत फसवणुकीच्या आरोपांमुळे कंपनी आधीच दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरे जात असल्याचे दीपक कोठारी यांना कळले. त्यामुळे अनेक वेळा पैसे परत मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. तसेच कंपनीत केलेली गुंतवणूक प्रत्यक्षात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी वापरत होते. दीपक कोठारी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या जोडप्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. ज्यामध्ये कलम 403 (मालमत्तेचा अप्रामाणिकपणे गैरवापर), कलम 406 (विश्वासघाताचे गुन्हेगारी उल्लंघन) आणि कलम 34 सामान्य गुन्हेगारी हेतू) यांचा समावेश आहे.









