वृत्तसंस्था/ मुंबई
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ते म्हणू द्या वा म्हणू नका, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. भारत आता स्वत:चे परराष्ट्र धोरण स्वत: ठरवतो, ते इतर कोणत्याही देशाकडून लादले जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केल्यानंतर त्यांचे हे विधान आले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता, मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, सर्व जागतिक नेत्यांना वाटते की, मोदी एक महान नेते आहेत. आजकाल अमेरिकेची भूमिका अशी आहे की, काही जण आमची प्रशंसा करतात आणि काही आम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. पण हा एक नवीन भारत आहे, मोदींचा भारत. आम्ही आमचे परराष्ट्र धोरण स्वत: ठरवतो आणि कोणीही त्याबाबतीत आम्हाला हुकूम देऊ शकत नाही’, असे ते म्हणाले. विकसित भारत बनण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. दक्षिण मुंबईतील त्यांच्या ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी स्थापित केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते.









