वृत्तसंस्था / लिव्हरपूल (ब्रिटन)
येथे सुरू असलेल्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या साक्षीने 54 किलो वजन गटात विजयी सलामी देताना युक्रेनच्या स्पर्धकावर शानदार विजय मिळविला.
महिलांच्या 54 किलो वजन गटातील पहिल्या फेरीतील लढतीत साक्षीने युक्रेनच्या महिला मुष्टीयुद्धीचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत विजयी सलामी दिली. त्याच प्रमाणे पुरूषांच्या 55 किलो वजन गटातील पहिल्याच फेरीतील लढतीत भारताच्या पवन बर्तवालने ब्राझीलच्या मिचेल डगलस ट्रीनडेडीचा 3-2 असा पराभव करत विजयी सलामी दिली. विश्व मुष्टीयुद्ध फेडरेशनच्या विद्यमाने सुरू झालेल्या पहिल्या विश्वमुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताचा 20 सदस्यांचा संघ सहभागी झाला आहे. महिलांच्या विभागात सेनामाचा छानु आणि पुरूषांच्या विभागात हर्ष चौधरी यांचे पहिल्या फेरीतील सामने खेळविले जाणार आहेत.
पुरूषांच्या 70 किलो वजन गटात भारताच्या हितेश गुलीयाने आपली लढत बरोबरीत राखली आहे. ब्राझील आणि कझाकस्तानमध्ये यापूर्वी झालेल्या दोन विश्वमुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताने समाधानकारक कामगिरी करताना एकूण 17 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये चार सुवर्णपदकांचा समावेश आहे. लिव्हरपूलमधील सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथमच पुरूष आणि महिला स्पर्धक एकत्रित आले आहेत. या स्पर्धेमध्ये 68 देशांचे सुमारे 544 स्पर्धक सहभागी झाले आहेत.









