चिपळूण :
काही दिवस मागे जाता येथे मुसळधार पडलेल्या पावसाने शहरात पूर आणला. मात्र तरीही गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ३२८.०७ मि. मी. कमी पाऊस पडला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असून अधूनमधून किरकोळ सरी कोसळत आहेत.
यावर्षी मे महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस पडला असला तरी जूनपासून सुरू झालेला नियमित पाऊस तितकास कोसळला नव्हता. त्यामुळे यावर्षी पावसाचे काय होणार, असा प्रश्न उभा ठाकला असतानाच जुलै महिन्याच्या अखेरीपासून पावसाने जोर धरला. ऑगस्ट महिन्यात तो मुसळधार पडल्याने शहरात पूर आला. यामुळे व्यापारी व नागरिकांचे तितकेस नुकसान झाले नसले तरी ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे घरे, पडव्या, गोठे कोसळून मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे झाले असले तरी नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही.
सुरूवातीला पावसाने मारलेल्या दडीमुळे सरासरी कमी झाली होती. ती मध्यंतरीच्या पावसाने बऱ्यापैकी रूळावर आली असली तरी गतवर्षीच्या २ सप्टेंबरपर्यंतच्या सरासरीपेक्षा ३२८.०७ मि.मी.ने कमी आहे. गतवर्षी २ सप्टेंबरपर्यंत ३७८१.६२ मि. मी. तर यावर्षी या तारखेपर्यंत ३४५३.५५ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी २ सप्टेंबरला २१.२२ मि.मी. तर यावर्षीही या तारखेला २१.२२ मि. मीटरच पाऊस पडला आहे. हा योगायोग घडला असून सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.








