मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचा आदेश
पणजी : देशातील एक नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून गणल्या गेलेल्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बिट्स पिलानी) संस्थेच्या गोवा कॅम्पसमध्ये गत दहा महिन्यात चक्क पाच विद्यार्थ्यांचे गूढरित्या मृत्यू होण्याच्या घटना खरोखरच गंभीर आणि चिंताजनक असून या प्रकरणाची दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. गुऊवारी पणजीत एका पत्रकार परिषदेदरम्यान सदर घटनेशी संबंधित प्रश्नावर ते बोलत होते. या घटनेच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपण लगेच फोन करून चौकशी केली. त्यावेळी 20 वर्षीय सदर विद्यार्थी बंगळुरू येथील असल्याचे समजले.
मात्र त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र गत दहा महिन्यात या संस्थेमध्ये अशाचप्रकारे झालेल्या मृत्यूच्या घटनांची दखल घेऊन त्यांची जिल्हाधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारच्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये अशा घटना म्हणजे शैक्षणिक क्षेत्राला काळीमा असून सदर संस्था आणि राज्यासाठीही अपकीर्तीदायक आहे. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी होणे क्रमप्राप्त आहे. अशावेळी या संस्थेला समुपदेशन किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज भासल्यास सरकारकडून उच्च शिक्षण संचालनालय यांच्या माध्यमातून देण्यात येईल. त्याचबरोबर आवश्यक सल्ला आणि सूचनाही जारी केल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. ही समिती केवळ दक्षिण गोव्यासाठीच नसून तर गोव्यात कुठेच अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी उत्तर गोव्यातही अशीच समिती स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.








